रेती तस्करी व अवैध वाहतूक प्रकरणी नऊ लाखांचा महसूल जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:01+5:302021-01-14T04:24:01+5:30
तहसील कार्यालयाची कारवाई मूल : तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांनी मूल तालुक्यात अवैध रेती वाहतूक, गिट्टीवर ताडपत्री ...

रेती तस्करी व अवैध वाहतूक प्रकरणी नऊ लाखांचा महसूल जमा
तहसील कार्यालयाची कारवाई
मूल : तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांनी मूल तालुक्यात अवैध रेती वाहतूक, गिट्टीवर ताडपत्री न झाकणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केले. केवळ तीन महिन्यात यातून सुमारे नऊ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने रेती घाटाचे अजूनही लिलाव केलेले नाही, परंतु अवैध रेती वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामुळे तालुका प्रशासनाने गस्त घालून अवैध रेती वाहतूकदारांवर कारवाई सत्र सुरू केले आहे. मूल तालुक्यात रेती तस्करी करताना मौजा बोरचांदली, सुशी, चिंचाळा आणि राजगड येथून रेती भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. मौजा चिखली, मूल, केळझर, चिचाळा, डोणी फाटा, आगडी येथे गिट्टी भरलेल्या हायवामध्ये ताडपत्री न झाकल्याच्या करणावरून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर मुरुम वाहतूक करीत असताना ताडपत्री न टाकल्यामुळे विरई येथे एका वाहनावर तहसील कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण वाहनावर ९ लाख १४ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी अनेक वाहने जप्त करण्यात आली आहे, परंतु अवैध वाहतूकदारांनी अनेक वाहनाचे दंड भरलेले नाही. यामुळे तहसील कार्यालय परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची रांग मोठी दिसून येत आहे. केवळ तीन महिन्यात लाखो रूपयाचा महसूल जमा करणारे मूलचे तहसीलदार डाॅ. रवींद्र होळी यांच्यामुळे मूल तालुक्यातील रेती तस्कर चांगलेच धास्तावलेले आहे.