अत्यवस्थ आरोग्यव्यवस्थेला जीवदान देण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय कॅडरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:55+5:302021-07-05T04:17:55+5:30
चंद्रपूर : शासकीय व खासगी क्षेत्रात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने एकत्र येत ‘कोरोना महामारी व आजची आरोग्यव्यवस्था’ ...

अत्यवस्थ आरोग्यव्यवस्थेला जीवदान देण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय कॅडरची गरज
चंद्रपूर : शासकीय व खासगी क्षेत्रात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांनी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने एकत्र येत ‘कोरोना महामारी व आजची आरोग्यव्यवस्था’ यावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यवस्थ झालेल्या आरोग्यव्यवस्थेला जीवदान देण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय कॅडर (आयएमएस)ची गरज असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सचिव डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले.
चर्चासत्रामध्ये गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, नोडल अधिकारी डॉ. बंडू रामटेके, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संदीप गेडाम, निमा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजू ताटेवार आदी सहभागी झाले होते. डॉ. गावतुरे पुढे म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांना जनतेच्या आरोग्याचा निर्णय घेण्याचा अधिकार ७३व्या घटना दुरुस्तीत देण्यात आला. परंतु, जिल्हा परिषद व महानगरपालिकांसारख्या स्वायत्त संस्था जनतेच्या आरोग्यासाठी ठोस पावले उचलताना दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स्वायत्त संस्थेतील लोक डॉक्टर नसतात. त्यांना त्या विषयाची माहिती नसते. आरोग्य क्षेत्र त्यात निपुण असलेल्या लोकांकडे दिले तर व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते. त्यासाठी आयएएस, आयपीएस यांसारख्या आयएमएसची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. जोपर्यंत निर्णय प्रक्रियेत केंद्रापासून प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीपर्यंत डॉक्टरांचे कॅडर असणार नाही, तोपर्यंत जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सुटणार नाही, असे मत डॉ. शशिकांत शंभरकर यांनी मांडले. डॉ. राजू ताटेवार यांनी पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ याप्रमाणे डॉक्टरांचे स्वतंत्र मतदारसंघ असणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. किरण वानखेडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात आउटसोर्सिंगमुळे आरोग्याची गुणवत्ता व स्थिरता कशी धोक्यात आली हे पटवून दिले. डॉ. राकेश गावतुरे यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजातील उच्चशिक्षित वर्गाने डॉक्टर डेला उत्सव म्हणून साजरा न करता ‘चिंतन दिवस’ म्हणून साजरा केल्यास नक्कीच नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. संचालन डॉ. दीपक जोगदंड यांनी, तर आभार डॉ. वीरेंद्र भावे यांनी मानले.