आईची ओळख पटली; बछड्याला सोडण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:57+5:30

२४ एप्रिल २०२० रोजी मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव येथून वन विभागाने चार महिन्याचा मादी बछडा ताब्यात घेतला होता. जंगलातून भरकटल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वाघाच्या बछड्याला कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून सुरूवातीला घशाचे नमुनेहीे तपासण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने वन विभागाने सुटकेचा श्वास घेतला.

The mother was identified; Preparing to release the calf | आईची ओळख पटली; बछड्याला सोडण्याची तयारी

आईची ओळख पटली; बछड्याला सोडण्याची तयारी

Next
ठळक मुद्देदोन्ही वाघिणींचा डीएनए अहवाल प्राप्त : टी २ वाघिणच निघाली बछड्याची आई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जंगलातून भरकटलेल्या बछड्याला त्याच्या आईकडे स्वाधीन करण्यापूर्वी त्या वनक्षेत्रात संचार करणाऱ्या दोन वाघिणींचे डिएनए नमुने वन विभागाने हैदराबाद येथील सेंटर फॉर सेलुल्लर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बॉयोलॉजी (सीसीएमबी) प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. ४० दिवसानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून टी-२ ही वाघिण बछड्याची आई असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्य प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीच्या मार्गदर्शनानुसार बछड्याला आईकडे स्वाधीन करण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.
२४ एप्रिल २०२० रोजी मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव येथून वन विभागाने चार महिन्याचा मादी बछडा ताब्यात घेतला होता. जंगलातून भरकटल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वाघाच्या बछड्याला कोरोनाची बाधा होऊ नये, म्हणून सुरूवातीला घशाचे नमुनेहीे तपासण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने वन विभागाने सुटकेचा श्वास घेतला. परंतु, जंगलात सोडल्यास जीवाला धोका असल्याने वन विभागाने त्या वनपरिसरात फिरणाºया दोन वाघिणींचे डीएनए नमुने हैदराबाद येथील सीसीएमबी प्रयोगशाळेत पाठविले होते. नमुने पाठविलेल्या टी २ आणि टी १ या दोन्ही वाघिणींना प्रत्येकी तीन बछडे असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे दोन वाघिणींपैकी बछड्याची आई कोण, हे सिद्ध होण्यासाठी वन विभागाला डिएनए अहवालाची प्रतीक्षा होती. मंगळवारी अहवाल येताच टी २ ही वाघिण बछड्याची आई असल्याचे स्पष्ट झाले.

भारतातील पहिलीच घटना
वाघिणीपासून बछडे दुरावण्याच्या घटना साधारणत: तराई लॅन्ड, दक्षिण आणि महाराष्ट्रात घडत असतात. आईची शिकार झाली अथवा काही दुघर्टना घडली तरच असा प्रकार घडू शकतो. ज्या क्षेत्रात एखादी वाघिणी असेल तर सहसा तिथे दुसरी वाघिण संचार करीत नाही. सुशी- दाबगाव जंगलात मात्र प्रत्येकी तीन बछडे असलेल्या दोन वाघिणी मिळाल्या. त्यामुळे बछड्याच्या आईची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी करण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे, अशी माहिती केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकमत’ला दिली.

मूल तालुक्यातील सुशी-दाबगाव जंगलातून ताब्यात घेतलेल्या बछड्याच्या आईची आता ओळख पटली आहे. आईकडे स्वाधीन करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्याकडे सादर करण्यात आला. पुढील मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यवाही केली जाणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
- ए. एल. सोनकुसरे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: The mother was identified; Preparing to release the calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ