किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
By राजेश भोजेकर | Updated: December 18, 2025 05:37 IST2025-12-18T05:37:22+5:302025-12-18T05:37:53+5:30
पीडित शेतकरी रोशन कुळे याने दिलेल्या माहितीनुसार, किडनी विक्रीपूर्वी कोलकाता येथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.

किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: सावकारांच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याने थेट किडनी विकल्याचा दावा केल्यानंतर हे प्रकरण केवळ अवैध सावकारीपुरते मर्यादित न राहता, आंतरराष्ट्रीय मानवी अवयवांच्या तस्करीच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत आहेत. कंबोडिया येथे किडनी विक्री झाल्याचा दावा तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे.
पीडित शेतकरी रोशन कुळे याने दिलेल्या माहितीनुसार, किडनी विक्रीपूर्वी कोलकाता येथे वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यासाठी त्याने चेन्नई येथील डॉ. क्रिष्णा यांच्याशी संपर्क साधला. डॉ. क्रिष्णा यांनी नागपूर ते कोलकाता प्रवासासाठी रेल्वेची तिकिटे पाठविली, कोलकाता रेल्वे स्थानकावर एक प्रतिनिधी घेण्यासाठी आला. त्यानेच प्रयोगशाळेत नेले. तेथे रक्त व आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉ. क्रिष्णा यांनी विमानाने कंबोडिया देशातील नानपेन येथे नेल्याचा दावा रोशन कुळे यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
निर्णय दबावातून की..?
किडनी विक्रीतून मिळालेली रक्कम थेट सावकारांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अवयव विक्री हा स्वेच्छेचा निर्णय होता, की सावकारांच्या दबावातून उचललेले टोकाचे पाऊल, याचा तपास सुरू आहे.
शेतकऱ्याची डाव्या बाजूची किडनी काढल्याचे उघड
१. पीडित शेतकरी रोशन कुळे यांनी किडनी विकल्याचा दावा केल्याने त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली. अहवालातून डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे.
२. यामुळे आता पोलिस किडनी दृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या तर या प्रकरणातील पाच आरोर्पीना बुधवारी ब्रह्मपुरी येथील न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.