आमदारांनी स्वत: स्वयंपाक करून दिले गरजूंना जेवणाचे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST2021-05-15T05:00:00+5:302021-05-15T05:00:41+5:30
कोरोनामुळे संपूर्ण देशात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या पोटालादेखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदारांनी स्वत: स्वयंपाक करून दिले गरजूंना जेवणाचे डबे
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या पोटाला चिमटा बसत आहे. कोरोना काळात आरोग्याच्या चिंतेसोबतच अनेकांना पोटाची चिंता लागली आहे. ही बाब हेरून प्रदेश महिला काँग्रेसने ‘एक घास मदतीचा’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात वरोरा काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी स्वत: हातात पोळपाट-बेलणे घेऊन स्वयंपाक केला आणि या जेवणाचे डबे गरजूंना दिले. महिलांनी पुढे येऊन या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
कोरोनामुळे संपूर्ण देशात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे लोकांच्या पोटालादेखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भुकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून नवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाची सुरुवात झाली. वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पुढाकार घेत स्वतः स्वयंपाक करून गरजू लोकांना डबे दिले. काँग्रेसच्या सर्व महिलांनी पुढे येऊन उपकरणात सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न पोहोचविले जाणार आहे.
महिला भगिनींनी घरातील मंडळींचा स्वयंपाक करताना त्यात अधिकच्या दहा पोळ्या कराव्यात. पावभर भाजी जास्त करावी. अशाप्रकारे ४०-५० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला, तर सुमारे ४०० ते ५०० पोळ्या तयार होतील. हे अन्न आम्ही महिला काँग्रेसच्यावतीने गरजूंना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात मोठे यश येईल, अशी आशा आहे.
- प्रतिभा धानोरकर,
आमदार, वरोरा विधानसभा मतदार संघ.