तीन हजार राष्ट्रीय खेळाडूंचे ‘मिशन ऑलिम्पिक’चे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:45 AM2023-11-22T11:45:06+5:302023-11-22T11:48:40+5:30

सुधीर मुनगंटीवारांकडून नियोजनाचा आढावा : विसापुरातील क्रीडा संकुलात राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा

Mission Olympic target of three thousand national athletes | तीन हजार राष्ट्रीय खेळाडूंचे ‘मिशन ऑलिम्पिक’चे लक्ष्य

तीन हजार राष्ट्रीय खेळाडूंचे ‘मिशन ऑलिम्पिक’चे लक्ष्य

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येईल. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यामुळे हे लक्ष्य साध्य करण्यास उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरिश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. त्यामुळे भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था व्हावी. नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या टीमने सज्ज राहावे. जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

प्रत्येकाची जबाबदारी

स्पर्धेसाठी तीन हजार खेळाडू येणार आहेत. त्यामुळे एनजीओ, क्रीडा संस्था व विविध खेळांशी संबंधित लोकांची टीम निश्चित करून त्यांची यादी तयार करावी. खेळाडूंना क्रीडांगणावर ने-आण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेससोबत शाळांच्या बसेस राखीव ठेवाव्यात. ऑनकॉल वाहने उपलब्ध ठेवावीत. स्टेडियमच्या रंगरंगोटीवर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धा केवळ क्रीडा विभाग नव्हे तर सगळे आयोजक आहोत, या भावनेतून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

राष्ट्रीय स्पर्धा दर्जेदारच होणार - क्रीडा मंत्री संजय बनसोडे

चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात शंकाच नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मंत्री मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात खेळाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

Web Title: Mission Olympic target of three thousand national athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.