१६ एकरामध्ये मिरचीचे लाखोंचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:02+5:302021-02-05T07:34:02+5:30
मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम अमोद गौरकर शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके ...

१६ एकरामध्ये मिरचीचे लाखोंचे उत्पादन
मिरची जाते दिल्लीला : इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
अमोद गौरकर
शंकरपूर : शेतकऱ्यांची सध्या दैन्यावस्था आहे. पारंपरिक पिके घेऊन उत्पादन क्षमता कमी झाल्याने शेतकऱ्यांना शेती परवडत नाही; परंतु शेतपिकाचे बाजारमूल्य ओळखून येथील एका शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने मिरचीचे उत्पादन घेऊन प्रगती साधली आहे. त्यांची मिरची दिल्लीला रवाना होत आहे.
ही यशोगाथा आहे शंकरपूरपासून जवळच असलेल्या बोरगाव डोये येथील मनिराम वैद्य या ५५ वर्षीय शेतकऱ्याची. २२ एकर त्यांची शेती असून ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते; परंतु पाहिजे तसा लाभ या शेतीतून त्यांना मिळत नव्हता. त्यामुळे शेती विकावी की ठेवावी हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर होता. परंतु यांचा मुलगा राजू वैद्य हे शंकरपूर येथे कृषी केंद्र चालवितात. स्वतः कृषी पदवीधर आहे. त्यांनी बाजारभाव बघितला. हिरवी मिरचीला चांगला बाजारभाव मिळत आहे आणि मागणी भरपूर आहे. याच धर्तीवर त्यांनी तीन वर्षे आधी फक्त पाच एकरमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. या पाच एकरात त्यांना मिरची उत्पादनातून खूप नफा झाला. मिरची पिकाखालील जमीन वाढविली आणि आज तब्बल १६ एकरमध्ये त्यांनी मिरचीचे उत्पादन घेतले आहे आणि त्यातून ७० लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी आतापर्यंत मिळवले आहे. अजून ३० ते ४० लाख रुपयांची मिरचीचे उत्पादन होणार आहे. ही मिरची तोडण्यासाठी परिसरातील २५ किलोमीटरच्या शेतमजुरांना काम मिळाले आहे. रोज त्यांच्या शेतावर १५० ते २०० मजूर काम करीत आहे आणि त्यांची ही मिरची दिल्ली येथील व्यापारी घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. त्यांची ही यशोगाथा पाहून साठगाव, आंबोली, चिचाळा, जवराबोडी, कोलारी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन घेत आहे आणि त्यांची मिरची या शेतकऱ्याच्या मार्फत दिल्लीला जात आहे.
कोट
पिकाला जो बाजारभाव येतो त्याचा जर अभ्यास केला आणि त्यानुसार जर पिकाची लागवड केली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायद्याची शेती करता येते. आधुनिकता, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, खताचा योग्य वापर आणि सूक्ष्म नियोजन जर केले तर उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना लाभ मिळतो.
-राजू वैद्य, शेतकरी, शंकरपूर