लोकवाहिनी देणार ‘मराठी भाषा दिन’चा संदेश
By Admin | Updated: February 27, 2016 01:16 IST2016-02-27T01:16:36+5:302016-02-27T01:16:36+5:30
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असली तरी मराठी माणूस मराठी भाषेकडे दुर्लक्ष करीत इतर भाषाच्या प्रेमात पडला आहे.

लोकवाहिनी देणार ‘मराठी भाषा दिन’चा संदेश
कुसुमाग्रजांचा जन्मदिन : बसस्थानकांवर लागणार फलक
राजकुमार चुनारकर खडसंगी
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असली तरी मराठी माणूस मराठी भाषेकडे दुर्लक्ष करीत इतर भाषाच्या प्रेमात पडला आहे. तेव्हा मराठी भाषेचे महत्त्व कळावे व मातृभाषेतून सर्व व्यवहार व्हावे, या दृष्टीने आता २७ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांची ‘लोकवाहिनी’ असलेली राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून मराठी भाषा दिनाचा संदेश गावागावात पोहचविला जाणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मात्र या शहरात व्यवसायानिमित्त अनेक राज्यातील विविध भाषीक नागरिक वास्तव्य करतात. येथे मराठी भाषीक जास्त असले तरी प्रत्यक्षात हिंदी, इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. शासकीय कामे देखील राष्ट्रभाषा हिन्दी व इंग्रजीतून केल्या जातात. या प्रकाराने राज्य शासनाने जास्तीत जास्त कामे मराठीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही प्रमाणात मराठी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी भाषेची महत्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टीने आता मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी कुसूमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. यामध्ये एस.टी. आगारातील बसस्थानकात २७ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता बसस्थानकावर ‘मराठी भाषा दिन’ फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक आगार कार्यक्षेत्रातील कोणत्याही ज्येष्ठ मराठी शिक्षक किंवा प्राध्यापकांना औपचारिक आमंत्रण देण्यात येणार असून त्यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.
तर जिल्हा पातळीवरील प्रमुख बस स्थानकावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ मराठी शिक्षक किंवा प्राध्यापकाच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे. तर ज्या आगारात जास्त बसस्थानके आहेत तेथे प्रमुख बसस्थानकावर आगार व्यवस्थापकाच्या हस्ते तर इतर बस स्थानकावर संबंधित आगारातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक, सहा. कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे.
मराठी भाषा दिनाचे कापडी फलक २७ फेब्रुवारीला सकाळी प्रवाशांना सुस्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने उद्घाटनासाठी लावण्यात येणार आहे. या ठिकाणी रांगोळी काढून सुशोभित करण्यात येणार आहे. मराठी भाषा दिनाचे भिती पत्रके (स्टिकर्स) प्रत्येक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालकाच्या मागील बाजुस बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना सुस्पष्टपणे दिसेल, अशा पद्धतीने सर्व बसमध्ये चिकटवण्यात येणार आहे.
त्यामुळे मराठी भाषा दिनाची महत्ती बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व स्तरातील प्रवाशांना कळणार आहे. त्यामुळे लोकवाहिनीतून आता मराठी भाषा दिनाचा संदेश घेऊन शनिवारपासून गावागावात पोहणार आहे.