The message of conservation of heritage from fort tourism | किल्ला पर्यटनातून वारसा संवर्धनाचा संदेश
किल्ला पर्यटनातून वारसा संवर्धनाचा संदेश

ठळक मुद्देइको-प्रोचा उपक्रम : पावसाळयानंतर पहिल्यांदाच हेरिटेज वॉक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने पावसाळयानंतर प्रथमच रविवारी हेरिटेज वॉक - किल्ला पर्यटनाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात संगिनी महिला ग्रुपच्या सदस्य आपल्या परिवारासह मोठया संख्येने सहभागी झालेल्या होत्या. यावेळी किल्ला पर्यटनातून वारसा संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मागील ८०६ दिवसांपासून चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान सुरू असून मागील ४४ रविवारपासून पहाटे सकाळी ६ ते ९ या दरम्यान किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरूवात करण्यात आलेली आहे. पावसाळयानंतर या पहिल्या हेरिटेज वॉक उपक्रमात शहरातील संगिनी महिला क्लबच्या सदस्य आपल्या परिवारासह सहभागी झालेल्या होत्या. यासोबत वनविभागातील कर्मचारीसुध्दा सहभागी झाले होते.
बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिर असा किल्ला पर्यटन परकोटाच्या भिंतीवरून ऐतिहासिक माहितीसह प्रवास पूर्ण केला जातो. या प्रवासादरम्यान किल्ला स्वच्छता अभियान, गोंडकालीन इतिहासाची माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे पर्यटक मार्गदर्शक म्हणून माहिती सांगितली जाते. बुरूज क्रमांक ४, ५, ६, ७, ८ व ९ असा प्रवास करताना मानवी हस्तक्षेप, अतिक्रमण, निसर्ग, वाढलेली झाडे, पुरांचा फटका यामुळे कशी वाताहत झाली.
किल्लाच्या काठावरील नागरिकांचा सहभाग, भविष्यातील किल्ला पर्यटन, पुर्णबांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, पाथवे, सायकल ट्रेक आदी विषयी माहिती देण्यात आली. किल्ला पर्यटनादरम्यान नागरिकांच्या विविध प्रश्नाची माहितीसुध्दा देण्यात आली.
यावेळी संगिनी महिला क्लबच्या सदस्यांसह डॉ अशोक भुक्ते, डॉ गाडेगोणे, डॉ विजय गिरी, डॉ. अजय दुदृदलवार, डॉ राजेश कांबळे, डॉ महेश भांडेकर, डॉ सुनिल संघई, डॉ तातावार, डॉ नवल राठी, डॉ शार्दुल वरंगटीवार, डॉ आंबटकर, डॉ नायडु आदी आपल्या परिवारासह सहभागी झाले होते. वनविभागाचे संतोष अतकरे सह वनकर्मचारीसुद्धा सहभागी झाले.

काय आहे हेरिटेज वॉक
हेरिटेज वॉक किल्ला पर्यटन म्हणजे इको-प्रो संस्थेने किल्ला स्वच्छतानंतर शहरातील ऐतिहासिक वारसा माहितीसह प्रत्यक्ष वास्तु-स्मारकांची सफर करीत इतिहास जाणून घेण्याकरिता सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. या उपक्रमात नागरिक-पर्यटक प्रत्येक रविवारला पहाटे ६ वाजता बगड खिडकी लगतच्या रामाळा तलावास लागून असलेल्या बुरूजावर एकत्रित येतात. या बुरूजापासून ते अंचलेश्वर गेटपर्यत परकोटावरून पायी चालत ही सफर पुर्ण केली जाते. विविध बुरूज, किल्लाच्या वेगवेगळया भागातून प्रवास, बगड खिडकी, मसन खिडकी व अन्य खिडकी, दरवाजे सोबतच या दरम्यान ऐतिहासिक माहीतीसह चंद्रपूरचा इतिहास जाणून घेण्याची संधी नागरिकांना मिळते. यामुळे शहरातील ऐतिहासिक पर्यटन व विकासाला चालना मिळेल, अशी आशा आहे.
३० दिवसांपासून मार्गाची स्वच्छता
मागील ३० दिवसांपासून हेरिटेज वॉकच्या मार्गाची स्वच्छता करण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू होते. पावासाळयानंतर आलेले झाडे-झुडपे काढून पुर्ववत करणे तसेच यंदाच्या पावसाळयात बगड खिडकी लगतच भिंत व बुरूज सात जवळचा काही भाग कोसळल्याने हा मार्ग चालण्यायोग्य करण्याचे आव्हान इको-प्रोच्या टिमपुढे होते. इको-प्रोच्या सदस्यांनी सतर श्रमदान करीत स्वच्छता व रस्ता योग्य करण्याचे काम पुर्ण केल्याने नियोजित हेरिटेज वॉकच्या तारखेपासून पंधरा दिवस उशिरा का होईना परत हेरिटेज वॉक सुरू झालेला आहे.

Web Title: The message of conservation of heritage from fort tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.