चिरोली : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक वैद्यकीय अधिकारी व केवळ ११ सहकाऱ्यांच्या खांद्यावर आरोग्य सेवेचा भार आहे. अनेक रिक्त जागांमुळे येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे. रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. एकेकाळी राज्यात उत्तम आरोग्य सेवा देणारे प्रााथमिक आरोग्य केंद्र म्हणून मूल तालुक्यातील या आरोग्य केंद्राला गौरविण्यात आले होते. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील सिकलसेल तपासणी केंद्रसुद्धा निर्माण करण्यात आले. या केंद्रातर्गत चिरोली, कांतापेठ, सुशी दाबगाव, नलेश्वर इत्यादी मोठ्या गावांसह १६ गावांतील सुमारे १७ हजार ३६९ गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली जाते. या केंद्रापासून मूल येथील उपजिल्हा रुग्णालय १३ किलोमिटर दूर असल्याने परिसरातील ग्रामीण लोकांना याच केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा घ्यावी लागते. परंतु ऐन पावसाळ्यात तालुक्यात अनेक ठिकाणी डेंग्यूसारख्या मोठ्या आजाराची लागण झाली असताना येथे मात्र पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद अद्यापही भरण्यात आले नाही. इतर २२ कर्मचाऱ्यांपैकी १२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक व परिचारिका औषध निर्मात्यासह इतर दुसरी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. या शिवाय शासकीय उपक्रम, सभा यामुळे आरोग्य सेवा देताना अनेकदा अडचणी निर्माण होतात. ग्रामीण भागातील आरोग्याविषयी जनजागृती निदान व उपचार चांगल्याप्रकारे करायचे असेल तर शासनाने रिक्त जागा त्वरीत भराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)
चिरोली आरोग्य केंद्राची वैद्यकीय सेवा कोलमडली
By admin | Updated: September 6, 2014 23:40 IST