शहरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मनपावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST2022-03-10T05:00:00+5:302022-03-10T05:00:22+5:30
भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास नेणे या सगळ्या ज्वलंत मागण्या घेऊन शेकडो स्त्री-पुरुष व युवक मनपावर धडकले.

शहरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मनपावर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महापौर, आयुक्त व मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूरमधील जनतेला सोबत घेऊन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे पक्षाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.
भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास नेणे या सगळ्या ज्वलंत मागण्या घेऊन शेकडो स्त्री-पुरुष व युवक मनपावर धडकले.
यावेळी अशोक निमगडे, विशाल अलोने, अशोक टेंभरे, राजस खोब्रागडे, प्रेमदास बोरकर, सुरेश शंभरकर, नागसेन वानखेडे, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, अश्विनी खोब्रागडे, अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, लीना खोब्रागडे, वर्षा घडसे, अंजली निमगडे, सुनीता बेताल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
उपायुक्तांचा दालनात निषेध
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन उपायुक्त अशोक गराटे यांना देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता, त्यांनी शिष्टमंडळासोबत उद्धट भाषेत संभाषण केले. त्यामुळे त्यांच्या दालनात निषेध नोंदविण्यात आला.