आ. देवतळेंना रील बनवणे पडले महागात ! ताडोबात मोबाइल वापरणे नियमबाह्य असतांनाही चक्क बनवली रील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 19:02 IST2026-04-06T19:01:06+5:302026-04-06T19:02:31+5:30
Chandrapur : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नियम धाब्यावर ठेवणे भाजप आमदार करण देवतळे यांना चांगलेच महागात पडले आहे. 'कोअर' व 'बफर' क्षेत्रातील सफारीदरम्यान मोबाइल बाळगण्यास व वापरण्यास सक्त मनाई असतानाही त्यांनी चक्क 'रील्स' तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.

Making a reel in Tadoba costs Deotales ! Even though it is illegal to use mobile phones in Tadoba, they made a reel.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नियम धाब्यावर ठेवणे भाजप आमदार करण देवतळे यांना चांगलेच महागात पडले आहे. 'कोअर' व 'बफर' क्षेत्रातील सफारीदरम्यान मोबाइल बाळगण्यास व वापरण्यास सक्त मनाई असतानाही त्यांनी चक्क 'रील्स' तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. या प्रकारानंतर वन्यजीवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, ताडोबा-अंधारी टायगर रिझर्व्ह कंझरव्हेशन फाउंडेशन, चंद्रपूर अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून यापूर्वीच पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ताडोबा प्रशासनाच्या नियमांनुसार सफारीदरम्यान मोबाइल सोबत बाळगणे नियमबाह्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. आमदार करण देवतळे यांनी बफर क्षेत्रातील 'निमढेला' गेटवरून सपत्नीक सफारी करताना मोबाइलचा वापर केला होता. व्हिडीओ शूट करताना जीपच्या आरशात मोबाइलचे प्रतिबिंब दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. मोबाइल बाळगणे किंवा वापरणे पूर्णतः प्रतिबंधित आहे. तरीही सफारीदरम्यान, वाघाचे आणि जंगलाचे फोटो काढण्याचा नादात आमदार देवतळे यांनी सुरक्षेचे सर्व नियमधाब्यावर बसविले. वाघाच्या नैसर्गिक अधिवासात नियमांचे उल्लंघन करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. हा प्रकार घडल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ३० जानेवारीलाच आमदार देवतळे यांच्याकडून ५ हजारांचा दंड वसूल केला.
"आमदार करण देवतळे यांनी ताडोबातील नियम मोडला. याबद्दल त्यांना तेव्हाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे."
- प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प.