माजरीत पुन्हा फोफावली गुन्हेगारी
By Admin | Updated: December 17, 2015 01:10 IST2015-12-17T01:10:26+5:302015-12-17T01:10:26+5:30
माजरीसह परिसरात पुन्हा गुन्हेगारांनी थैमान घातले असून रोजच कुठे ना कुठे अनूचित घटनेने दिवस उजाडतो.

माजरीत पुन्हा फोफावली गुन्हेगारी
परिसर भयभीत : चोरी करून चोरट्यांनी घरे जाळली
माजरी : माजरीसह परिसरात पुन्हा गुन्हेगारांनी थैमान घातले असून रोजच कुठे ना कुठे अनूचित घटनेने दिवस उजाडतो. १२ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान पैकाजी किसन कन्नाके व त्यांच्या शेजारी कमालबाई ज्ञानेश्वर आत्राम रा. माजरी खदान दफाई नं.१ यांचे घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी तर केलीच. सोबतच सामानाची नासधूस करुन घरे जाळली होती. आता पुन्हा चोरीच्या घटनात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
सदर घटनेच्या दिवशी घरचे सदस्य घरी नव्हते. कन्नाके दाम्पत्य एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे मुक्कामी होते तर मुलगा रवी हा शिक्षणासाठी वणी येथे राहतो. दुसऱ्या दिवशी घटनेची फिर्याद रवी पैकाजी कन्नाके व श्रीमती आत्राम यांनी माजरी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देवून पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध भांदवी ४५७, ३८०, ४३६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेत कन्नाके यांच्या घरुन ५० हजार रुपये रोख व पाच ग्रामची सोन्याची अंगठी आणि आत्राम यांच्या घरुन सोने चांदीच्या दागिण्यांची चोरी झाल्याचे फिर्यादीत सांगितले. चोरी केल्यानंतर अज्ञात आरोपींनी फ्रीज, सागवानी पलंग, दोन आलमारी, कपडे व रवी कन्नाके यांच्या शिक्षणाचे व इतर महत्त्वाची कागदपत्र जाळली. यामुळे या दोन्ही कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेमुळे माजरी परिसरात भय निर्माण झाले असून स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेची माहिती रवी कन्नाके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनाही दिली. आरोपींना जेरबंद करावे व कागदपत्रासाठी सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)