मूल उपजिल्हा रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर

By Admin | Updated: June 16, 2017 00:40 IST2017-06-16T00:40:05+5:302017-06-16T00:40:05+5:30

वातावरणात जसजसा बदल होत आहे, तसे रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. यामुळे येथील खासगीसह सरकारी

The main subdivision hospital became the headquarters of the problem | मूल उपजिल्हा रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर

मूल उपजिल्हा रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघर

दररोज शेकडो रुग्णांची नोंदणी : अस्वच्छतेचा कळस, खाटांवर किड्यांचे साम्राज्य
भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : वातावरणात जसजसा बदल होत आहे, तसे रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. यामुळे येथील खासगीसह सरकारी रुग्णालयात रुग्णाची अफाट गर्दी वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने व रुग्णालयात असलेल्या अस्वच्छतेमुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासन आणि आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील कारभार सध्या वाऱ्यावर सुरू असून रूग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे.
मूल तालुक्याची वाढती लोकसंख्या व जनतेच्या सेवेसाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहायाने अडीच कोटी रुपये खर्च करून मूल येथे वाढीव पन्नास खाटांचे श्रेणीवर्धीत भव्य आणि सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली. रूग्णालयात प्रशिक्षित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यासह ४६ पदांना मंजुरी देण्यात आली.
परंतु आजच्या स्थितीत येथील १९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामध्ये विशेषत: सर्जन, फिजीशियन व बधिरीकरण तज्ज्ञ यांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर या रुग्णालयात संपुर्ण पदे भरण्याचे आश्वासन तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी ५ मे २००२ दिले. परंतु अजुनही ते पुर्ण झाले नाही.
या ठिकाणी १३ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्त आहे. प्रभारीच्या खांद्यावर येथील उपजिल्हा रुग्णालय चालविल्या जात आहे. याकडे शासन आणि आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सहा. अधिसेविका वर्ग ३ चे १ पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार परिसेविका काटकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु त्या मुख्यालयी राहात नसल्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे तिनतेरा वाजत आहे.
रुग्णालयाने अस्वच्छतेचा कळस गाठलेला असून अनेकदा रुग्णांच्या खाटांवर किडांचे साम्राज्य पसरलेले दिसते. अधिपरिचारिका कुणाचेही ऐकण्यास तयार नाही. याकडे कुणाचेही लक्ष नाही. रुग्णालयात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सहा. अधिसेविकेची असते. परंतु प्रभार असलेल्या काटकर या मुख्यालयी राहत नसल्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र आरोग्य प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
तसेच आयुष व शालेय तपासणी पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णावर उपचार केल्या जात आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात ४६ पदांना मंजुरी आहे. त्यापैकी १९ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये वैद्यकीय अधीक्षक १, सर्जन १, बधिरीकरण तज्ज्ञ १, फिजिशयन १, सहा. अधिसेविका १, परिसेविका १, अधिपरिचारिका २, कारभारी १, कनिष्ठ लिपीक १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, क्ष-किरण तंत्रज्ञ १, औषधी निर्माता २, शिपाई १, बाह्यरुग्ण सेवक १, वर्णोपचारक १, शस्त्रक्रियागृह परिचर १, नेत्रचिकित्सक सहायक १ पद रिक्त आहेत.
राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच गृहक्षेत्रातील मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांना ग्रहण लागले आहे. त्यामुळे त्यांनी आता तरी लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडत आहे. रुग्णांच्या बेडवर किडे असतानाही परिसेविका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून रुग्णालयात स्वच्छता राहावी यासाठी प्रयत्न करावे.
- अशोक भीमनवार, रुग्णाचे मित्र
उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच स्वच्छता ठेवतो. रुग्णालय स्वच्छ ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. परंतु सफाई कामगारानी रुग्णालयाची स्वच्छता केली नसेल तर त्याची चौकशी करून रुग्णालय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सुचना देवू.
- डॉ. अनिल गेडाम, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक,
उपजिल्हा रुग्णालय, मूल.

Web Title: The main subdivision hospital became the headquarters of the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.