७५ ग्रा.पं पैकी ३७ गावांमध्ये येणार महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:04+5:302021-02-05T07:36:04+5:30
: काहींना फटका, तर काहींना आनंद ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत शुक्रवारी पंचायत समितीच्या संत गाडगेबाबा ...

७५ ग्रा.पं पैकी ३७ गावांमध्ये येणार महिलाराज
: काहींना फटका, तर काहींना आनंद
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत शुक्रवारी पंचायत समितीच्या संत गाडगेबाबा सभागृहात काढण्यात आली. गावाचा कारभारी कोण होणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली प्रतीक्षा शुक्रवारी संपली. यात काहींना फटका बसला, तर काहींना सुखद धक्का बसला.
नव्यानेच निवडणूक झालेल्या ७० ग्रामपंचायतींपैकी काही ठिकाणी सत्तेची समीकरणेच पार बदलून गेली. सत्ता एकाची आणि सरपंच दुसऱ्या गटाचा, अशी स्थिती झाली आहे, तसेच तालुक्यातील गांगलवाडी या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या वर्गाचे आरक्षण निघाले तिथे त्या प्रवर्गातील उमेदवारच कोणत्याही गटाकडे उपलब्ध नाही, अशीही परिस्थिती निर्माण झाली आहे.
दुपारी २ वाजता पंचायत समितीच्या संत गाडगेबाबा सभागृहात आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सदर सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी सकाळपासूनच केंद्रावर इच्छुकांनी गर्दी केली होती. गावाचे नाव पुकारताच इच्छुकांची घालमेल वाढत होती. तालुक्यातील एकूण ७५ ग्रामपंचायतींपैकी ३७ ग्रामपंचायतींच्या कारभारी महिला बनल्या आहेत. उर्वरित ३८ ग्रामपंचायतींचा कारभार पुरुषांच्या हाती देण्यात आला आहे.
बाॅक्स
...असे निघाले आरक्षण
११ पदे अनुसूचित जाती, ६ अनुसूचित जमाती, २० इतर मागास वर्गासाठी, तर ३८ ग्रामपंचायतींमध्ये खुल्या प्रवर्गातील आरक्षण निघाले आहे.