वरोरा : पंचायत समिती वरोरा अंतर्गत येत असलेल्या मांडवघोराड येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाची बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्य प्रदेशद्वाराला कुलूप ठोकले. या घटनेने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली होती.वरोरा पंचायत समिती अंतर्गत मांडव घोराड येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता १ ते ५ वी पर्यंतचे वर्ग असून २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १ ते ५ वीपर्यंतच्या वर्गाला दोन शिक्षक मागील काही दिवसांपासून शिकवीत आहे. एका शिक्षकाचे संबंध नेहमीच गावकऱ्यासोबत वादग्रस्त राहिले आहे. काही दिवसांपूर्वी सदर शिक्षक व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले. परंतु काहींनी मध्यस्थी करुन सदर प्रकरणावर पडदा टाकला. त्यानंतर सदर शिक्षक रजेवर गेले. त्या दरम्यान या शिक्षकाची बदली करण्याची मागणी मांडवघोराड येथील नागरिकांनी शिक्षण विभागाकडे केली. शिक्षण विभाग दखल घेत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त करीत आज दुपारी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. जोपर्यंत या शिक्षकाची बदली करण्यात येत नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. गटशिक्षणाधिकारी आर. आर. चव्हान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा दिला. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप
By admin | Updated: September 1, 2014 23:27 IST