मूल तालुक्यात दारूविक्री जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:34 IST2018-04-30T23:34:39+5:302018-04-30T23:34:48+5:30
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

मूल तालुक्यात दारूविक्री जोमात
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ला दारूबंदी करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात दारूचे सेवन करणे, दारू बाळगणे, दारूची वाहतूक करणे, दारूविक्री करणे गुन्हा आहे. परंतु मूल तालुक्यात सर्रास दारूची वाहतूक व विक्री होत आहे.
काही दिवसांपुर्वी मूल येथील पटवा नामक दारूविक्रेत्याच्या घरून २६ लाखांची देशी-विदेशी दारू पकडण्यात चंद्रपूर येथील गुन्हे शाखेला यश आले. मात्र मूल पोलिसांना त्याबाबत माहिती नव्हती. यावरून मूल पोलीस अवैध दारूविक्रीबाबत किती गंभीर आहेत, हे दिसून येते.
मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यास दारूविक्री करणाऱ्यांचे जबंग फुटू शकतो. मात्र याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
एखाद्या दारू तस्कराची माहिती मिळाल्यास केवळ देखावा करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्या कारवाईत अल्पसा दारूसाठा दाखविले जात असल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अंमलबजावणी करणारेच करतात दुर्लक्ष
दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत असल्याने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूबंदी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन करण्यात आले. श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात अनेक आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. यामुळेच शासनाने जिल्हात दारूबंदी केली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.