लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : जीएमआर एनर्जी या कंपनीकडून कामगारांना कामावरून कमी करून परप्रांतीय कामगारांचा भरणा होत आहे व काही कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याने याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र आतापर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे काल मंगळवारी काँग्रेसच्या नेतृत्वात कामगारांनी कंपनीसमोर निदर्शने केली. लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. जीएमआर एनर्जी या वीज प्रकल्पात फिलिप्स इंजिनिअरिंग अँड सर्व्हिसेस, मेल्को, अथर्वा, साई ऊर्जा, जय लहरी इंटरप्राइजेस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उप कंपन्याच्या माध्यमातून शेकडो कामगार कार्यरत आहे. मात्र काही महिन्यापासून कंपनीत कार्यरत स्थानिक कामगारांना अकारण कमी करून परंप्रांतीय कामगारांचा भरणा होत आहे. तसेच काही कामगारांना हेतुपुरस्पर इतर ठिकाणी बदली करण्यात आली. या सर्व मागण्यांना घेऊन काँग्रेसतर्फे गेल्या काही महिन्यापासून कंपनीसोबत संघर्ष सुरु आहे. कंपनी प्रशासनाच्या हेकेखोर धोरणापासून त्रस्त असणारे कामगार काँग्रेसचे नेते डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे यांच्याकडे गेले असता त्यांनी कामगारांचा प्रश्न रेटून धरला आहे. एक महिन्यापूर्वी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन केले होते. कंपनी प्रशासन लक्ष देत नसल्याने मंगळवारी त्रस्त कामगारांनी काँग्रेसच्या नेतृत्वात कंपनीसमोर निदर्शने केली. कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, बुद्धीपरस्पर परराज्यात केलेल्य्या बदल्या रद्द कराव्या, अशा विविध मागण्यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले. यावेळी डॉ. विजय देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले , विजय पुरी, नगरसेवक विठ्ठल टाले ,चरण मोडक, सोमदेव घोयाड, मिलिंद भोयर, अमोल शेलकर व कामगार उपस्थित होते.
जीएमआर एनर्जी कंपनीसमोर कामगारांची निदर्शने
By admin | Updated: May 25, 2017 00:26 IST