पहाडावरील कुंभेझरीची शाळाच वेगळी... !
By Admin | Updated: August 18, 2014 23:23 IST2014-08-18T23:23:24+5:302014-08-18T23:23:24+5:30
कॉन्व्हेटच्या संस्कृतीत मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा दर्जा घसरत असल्याची ओरड आहे. मराठी शाळांकडे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काहीशी पाठ फिरविली आहे.

पहाडावरील कुंभेझरीची शाळाच वेगळी... !
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
कॉन्व्हेटच्या संस्कृतीत मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा दर्जा घसरत असल्याची ओरड आहे. मराठी शाळांकडे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काहीशी पाठ फिरविली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र पालकांचे मन मराठी शाळांकडे वळविण्यात पाहिजे तसे यश आजही आले नाही. मात्र अतिदुर्गम आणि पहाडावर असलेल्या जिवती तालुक्यापासून १२ कि.मी.वर असलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेची किमया काही वेगळीच आहे. शहरी भागाच्या तुलनेत येथील विद्यार्थी गुणवत्तेत आजही कमी नाही.
जिवती येथून बारा कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभेझरी हा परिसरात अतिदुर्गम आणि पहाडावरील भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी आजही व्यवस्थित रस्ता नाही. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची चकाकी काही औरच आहे. शहरी भागातील शाळांही एकवेळ लाजेल, अशी किमया या शाळेने साधली आहे. केवळ इमारतच नाही तर, तेथील प्रत्येक गोष्ट आल्हाददायक आहे. विद्यार्थी दररोज हसत-हसत शाळेत येतात. यासाठी शाळेतील वातावरण तसे तयार करण्यात आले आहे. शाळेतील बाह्य परिसर स्वच्छ आहे. फुलझांडांनी सुशोभित करण्यात आला आहे. भिंतीवर सुंदर घोषवाक्य लिहिलेली आहे. शाळा परिसरात मुलांसाठी अनेक प्रकारची खेळणी आहे. शाळेत ओपन डायनिंग हॉलसुद्धा बनविण्यात आला आहे. मोकळ्या परिसरात कडप्प्यांच्या सहाय्याने जेवणाचे टेबल व बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हात व ताट धुण्यासाठी स्वतंत्र ओटे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, येथील पाण्याचा उपयोगही झाडांसाठी करण्यात आला आहे. वर्गखोल्यांमध्येही वातावरण अभ्यासासाठी पोषक आहे. बोलक्या भिंती वर्गखोल्याचे आकर्षण आहे. या सर्व साहित्याचा वापर येथील शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी पुरेपूर करीत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थितीसाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी चिंता व्यक्त करीत असताना या शाळेतील उपस्थितीही वाखाण्याजोगी आहे. येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी या शाळेला नुकतीच भेट दिली असून पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती घेतली.