सर्व घटकांशी संवाद साधूनच विकास शक्य
By Admin | Updated: November 30, 2014 23:02 IST2014-11-30T23:02:01+5:302014-11-30T23:02:01+5:30
गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास

सर्व घटकांशी संवाद साधूनच विकास शक्य
ब्रह्मपुरी : गोंडवाना विद्यापीठ गतीमान होण्यासाठी व सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांशी संवाद साधून, सर्वांच्या समस्या व त्यावरील उपाय विचारात घेऊनच विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले.
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयच्या वतीने महाविद्यालयात आयोजित चर्चासत्रात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संलग्नित असलेल्या विविध महाविद्यालयीन संचालक मंडळींशी, प्राचार्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर ने.हि. शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या, सहसचिव अॅड. भास्करराव उराडे, डॉ.पी.एम. डोळस, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार-समन्वयक नागपूर विभागाचे प्रभारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, उपप्राचार्य डॉ.डी.ए. पारधी, विज्ञानशाखेचे अधिष्ठाता डॉ. अमीर धम्मानी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध संस्थांचे सन्माननिय पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता. चर्चासत्राची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी मदनगोपालजी भैय्या यांना मालार्पण करून तसेच विद्यापीठ गीताने झाली. याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचा ने.हि. महाविद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षाचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो म्हणूनच या समस्येवर मात करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी संवाद साधून व अनावश्यक नियम व अडथळे दूर करून विद्यापीठाचा विकास व भावी वाटचाल करणे शक्य आहे. विद्यापीठाचे वय अवघे तीन वर्षांचे आहे. विद्यापीठासमोर अनेक समस्या असून प्राधिकरण नसल्याने निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो, असेही दीक्षित यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी कुलगुरुंनी उपस्थित विविध महाविद्यालयीन संस्थाचालक मंडळींशी, प्राचार्यांशी, प्राध्यापकांशी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संवाद साधला. (तालुका प्रतिनिधी)