चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. कोरपना, वरोरा, भद्रावती, चिमूर आदी तालुक्यांमध्ये काही गावांत फ्लोराईडचे प्रमाण जास्त आहे. या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने निरीच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील फ्लोराईडयुक्त गावांची पाहणी करीत पाण्याचे नमूने गोळा केले आहे. गोळा केलेल्या पाण्याची लवकरच तपासणी करण्यात येणार असून या गावांतील पाणी समस्येबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.जिल्ह्यात अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाणी आहे. सदर पाणी नागरिक पित असल्याने आजाराची समस्या गंभीर होत आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्यामुळे अनेकांना हाळांचे आजार झाले आहेत. तर काहींना कमरेतून वाक आला आहे. नागरिक आपला एक-एक दिवस कंठित आहे. जिल्ह्यातील हे प्रमाणात लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने काही गावांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून देण्यात आले. काही गावांना दुसऱ्या गावावरून पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र अधिक खर्चाचे काम असल्याने अद्यापही अनेक गावांमधील नागरिक फ्लोराईडयुक्त पाणी पीत आपली तहान भागवित आहे. यामुळे दिवसेंदिवस आजार गंभीर रुप धारण करीत आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने निरीच्या चमूने जिल्ह्यातील वरोरा,चिमूर तसेच अनेक तालुक्यातील गावांमध्ये जावून पाणी नमूना तपासणी सुरु केली आहे. चमूमध्ये नॅशनल जिओफीजीकल रिसर्च इंस्टिट्यूट हैद्राबादचे डॉ. डी.एन. रेड्डी, निरीचे शास्त्रज्ञ डॉ. पद्माकर, डॉ. खडसे यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पाणी गुणवत्ता तज्ज्ञ अंजली डाहुले, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ बंडू हिरवे, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रविण खंडारे, उपविभागीय अभियंता शेंडे आदी उपस्थित होते.या चमूने वरोरा तालुक्यातील राळेगाव ,महालगाव, दादापूर, सातारा, खातोडा, टेमुर्डा आदी गावांतील पाण्याचे नमूने घेतले असून तपासणीसाठी नेले आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी प्रयोगशाळेमध्ये या गावातील पाण्याची तपासणी केली असता या गावांतील पाण्यामध्ये १.५ पीपीएमपेक्षा जास्त फ्लोराईडचे प्रमाण आढळून आले. त्यामुळे आता निरीच्या शास्त्रज्ञांनी पाण्याचे नमुने गोळा करून त्यावर अभ्यास करणार आहे. सोबतच डोंगरगाव येथील फ्लोराईडच्या खाणीचीही तपासणी केली आहे. येथीलही फ्लोराईडचे नमूने नेण्यात आले आहे. तपासणीसाठी नेण्यात आलेल्या नमून्यानंतर या गावातील पाण्याच्या समस्येसाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र जोपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना होणार नाही तोपर्यंत येथील नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाणी पिण्याशिवाय इलाज नाही.(नगर प्रतिनिधी)
‘नीरी’कडून फ्लोराईडग्र्रस्त गावांची पाहणी
By admin | Updated: September 6, 2014 23:38 IST