अमानुष ! चंद्रपुरात कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला पेट्रोल टाकून जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 20:53 IST2017-12-15T20:51:38+5:302017-12-15T20:53:00+5:30
चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

अमानुष ! चंद्रपुरात कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला पेट्रोल टाकून जाळले
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चहाटपरीवर केलेल्या कामाचा मोबदला मागायला गेलेल्या नोकराला मालकाने पेट्रोल टाकून जाळले. ही थरारक घटना चंद्रपुरातील गंजवॉर्डातील एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. भोजराव प्रेमलाल किल्लेकर (४०) रा. बिनबा गेट, चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी देवीदास गंगाधर धामनगे (४२) रा. ताडबन, अंचलेश्र्वर वॉर्ड, चंद्रपूर याला अटक केली आहे.
भोजराव हा देवीदास धामनगे याच्या चहाटपरीवर सकाळी पाणी भरुन दुकानाची स्वच्छता करण्याचे काम करीत होता. त्यासोबतच तो गंजवॉर्डमध्ये हमालीचे काम करायचा. गुरुवारी रात्री भोजराव आपल्या कामाचा मोबदला मागण्यासाठी गेला. दरम्यान दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर देवीदासने भोजरावच्या पाठीवर हातोडीने गंभीर घाव घातला. यामध्ये तो खाली पडला. त्यानंतर देवीदास धामनगे या चहापटरी मालकाने त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळले. त्याला नागरिकांनी गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपरार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा भोजरावची प्राणज्योत मालवली. परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला दिली. लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एस. एस. भगत, पीएसआय कावडे, एपीआय कोंडावार, हेडकॉन्स्टेबल जीवतोडे, पाल, संघमित्रा कांबळे घटनास्थळावर दाखल झाले. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.