वरोरा मतदार संघात उद्योग आले; परंतु बेरोजगारी व प्रदूषणात वाढ

By Admin | Updated: December 13, 2015 00:48 IST2015-12-13T00:48:25+5:302015-12-13T00:48:25+5:30

१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला.

Industry came to the Varora constituency; But unemployment and pollution increase | वरोरा मतदार संघात उद्योग आले; परंतु बेरोजगारी व प्रदूषणात वाढ

वरोरा मतदार संघात उद्योग आले; परंतु बेरोजगारी व प्रदूषणात वाढ

प्रवीण खिरटकर वरोरा
१० वर्षापासून वरोरा विधानसभा मतदार संघात उद्योग आले. त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना चांगला दिलासा मिळाला. उद्योगांना आपल्या पिढ्यान्पिढ्यान कसणाऱ्या शेत्याही दिल्या. एका पाठोपाठ एक असे सहा उद्योग सुरू झाले. परंतु या उद्योगाचा नागरिकांना लाभ झाला नाही तर बेरोजगारीच्या संख्येत वाढ व प्रदूषणाने आरोग्य व शेतातील पिके दरवर्षी धोक्यात येत आहे. या उद्योगामुळे नागरिक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे.
वरोरा विधानसभा मतदार संघात मोहबाळा गावानजिक १९९२ च्या सुमारास महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने शेतकऱ्यांकडून जागा घेतली. त्यानंतर कित्येक वर्ष या परिसरात एकही उद्योग आला नाही. दहा वर्षापूर्वी सदर जागेत वर्धा पॉवर, जीएमआर हे वीज निर्मितीचे उद्योग सुरू झाले तर भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा नावाने खुली कोळसा खदान सुरू झाली. वरोरा तालुक्यातील नागरी गावाजवळ आय.एस.एम.टी. नावाचा वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला. सदर प्रकल्प काही वर्ष चालल्यानंतर सध्या तो बंद आहे. वरोरा तालुक्यात सनफ्लॅग कंपनीची भूमीगत कोळसा खदान व बी.एस. इस्पात कंपनी सालोरी येन्सा ब्लॉकमध्ये सुरू आहे. बी.एस. इस्पात कंपनीच्या धुरामुळे परिसरातील पिके दरवर्षी धोक्यात येतात. त्यामुळे पिकाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकरी नेहमी आंदोलन करीत असतात. धुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तर मनुष्याच्या आरोग्यावर किती विपरित परिणाम होईल, हे दिसून येत आहे. सनफ्लॅग कंपनीने सोडलेल्या पाण्यामुळे तसेच कोळशाच्या वाहतुकीने परिसरातील शेतकरी मागील कित्येक दिवसांपासून काही ना काही तक्रारी करीत आहेत. परंतु आजतागत कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला नाहीे. वर्धा पॉवर कंपनी व जी.एम.आर. कंपनीच्या धुरामुळे अनेक गावकरी त्रस्त आहेत. स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी अनेकदा राजकीय पक्षांनी आंदोलने उभी केली. आंदोलन झाले की काही स्थानिकांना उद्योगात अस्थायी स्वरूपाची कंत्राटदाराकडे नोकरी दिली जाते. काही दिवसांनी त्यांची हकालपट्टी केली जाते. कर्नाटक एम्टा कंपनी सध्या बंद असल्याने त्याच्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंपनी केव्हा सुरू होणार याबाबत कुणीही काहीही सांगण्यास तयार नसल्याने कामगार संकटात सापडले आहे. याही उद्योगातून जमिनी गेलेल्या स्थानिकांना नोकरीपासून डावलले जात असल्याने कंपनीबाबत स्थानिकांमध्ये चांगलाच रोष व्यक्त केला जात आहे. परिसरातील काही उद्योग वगळता उद्योग क्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये सामाजिक बांधीलकी योजनेतून थातुर-मातूर प्रकल्प राबवून नागरिकांची बोळवण केली जात आहे. अशाप्रकारे सर्वकाही सुरू असल्याने उद्योग येवूनही बाजारपेठेतील उलाढालीत फारसी काहा बदल झाला नसल्याचे व्यापारी आजही सांगत आहे.
उद्योग आल्याने आनंदी झालेल्या वरोरा मतदार संघातील नागरिकांमध्ये दिवसागणिक नाराजी पसरत आहे. उद्योगामधून निघणाऱ्या धुरामुळे जनजीवन येत्या काही दिवसात विस्कळीत होण्याची चिन्ह दिसत आहे. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने व शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची निश्चितच गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Industry came to the Varora constituency; But unemployment and pollution increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.