पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 10:36 IST2025-09-13T10:35:08+5:302025-09-13T10:36:34+5:30
पावसाचा जोर वाढल्याने पाणी रेडिएटरपर्यंत आले आणि बस पूर्णपणे अडकली.

पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप
चंद्रपूर - शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चंद्रपूर आगाराची बस (क्रमांक MH40 N 9426) रेल्वे पटरीखालील बोगद्यात अडकून पडली. सुदैवाने बसमधील प्रवासी व कर्मचारी सुखरूप बचावले आहेत. आज सकाळी बसला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.
भादुर्ली ते मुल असा प्रवास करणारी ही बस रेल्वे बोगद्यात आली असता पाणी साचलेले होते. बोगद्यात सुमारे एक-दोन फूट पाणी असूनही चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी सायलेन्सरमध्ये गेल्याने इंजिन बंद पडले. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने पाणी रेडिएटरपर्यंत आले आणि बस पूर्णपणे अडकली.
या वेळी बसमध्ये तिघे प्रवासी होते. तिघेही तसेच चालक व वाहक सुखरूप आहेत. ही घटना चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी, सहाय्यक यांत्रिक अभियंता आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या अडकलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.