दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत सुधारणा; थेट बँक खात्यात जमा होणार अडीच लाखांचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 19:37 IST2025-12-24T19:35:54+5:302025-12-24T19:37:47+5:30
Chandrapur : ५० टक्के रक्कम पाच वर्षांकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य राहणार

Improvements in the Disabled Marriage Promotion Scheme; Rs 2.5 lakhs will be deposited directly into the bank account
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत सुधारणा करत अनुदानाच्या रकमेतही वाढ केली आहे. आता दिव्यांग अव्यंग विवाहासाठी १.५ लाख रुपये, तर दिव्यांग-दिव्यांग विवाहासाठी २.५ लाख रुपये अनुदान मिळेल. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाईल. यातील ५० टक्के रक्कम पाच वर्षाकरिता मुदत ठेवीत ठेवणे अनिवार्य राहणार आहे.
जोडप्याचा विवाह नोंदणीकृत असावा
हा लाभ केवळ प्रथम विवाहासाठी लागू असून, विवाहानंतर एका वर्षाच्या आत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे. विवाहाची नोंद असणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाकडून विवाहाचा सहज स्वीकार होईल.
संयुक्त बँक खात्यात रक्कम येणार
नवीन शासन निर्णयानुसार, दिव्यांग-अव्यंग विवाहासाठी अनुदान ५० हजार रुपयांवरून वाढवून १ लाख ५० हजार रुपये करण्यात आले आहे. दिव्यांग-दिव्यांग विवाहासाठी २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. ही रक्कम पती-पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे जमा होईल, असे शासन निर्णयात नमूद आहे.
योजनेसाठी काय आहेत इतर अटी, शर्ती?
वधू अथवा वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र (यूआयडी) आवश्यक आहे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
योजनेच्या लाभासाठी समितीची स्थापना
अर्ज मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समिती आहे. या समितीत जि. प. सीईओं, सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सहायक आयुक्त समाज कल्याण, सदस्य सचिव म्हणून दिव्यांग कल्याण अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विवाह प्रोत्साहन योजनेत सुधारणा
दिव्यांग दिव्यांग विवाह योजना अनुदान ही योजना दिव्यांग अव्यांग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदानात वाढ आणि दिव्यांग-दिव्यांग हा घटक नव्याने समाविष्ट करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात अनुदानातही वाढ करण्यात आली आहे. आता दिव्यांग अव्यंग विवाहासाठी दीड लाख रुपये तर दिव्यांग-दिव्यांग विवाहासाठी अडीच लाखाचे अनुदान देण्याचा निर्णय आहे.