दारू दुकान नसलेल्या गावात दारूची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:56+5:302021-09-18T04:29:56+5:30
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ मध्ये जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आता दारूबंदी उठविण्यात आली ...

दारू दुकान नसलेल्या गावात दारूची अवैध विक्री
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ मध्ये जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आता दारूबंदी उठविण्यात आली आहे. दारू दुकानेही सुरू झाली आहेत. मात्र ग्रामीण भागात ज्या गावात दारू दुकाने नाहीत, तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू झाली आहे.
दारूबंदी उठवल्यानंतर आता दारू तस्करांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. जिवती शहरातील विदेशी देशी दारू दुकानातून अवैधरीत्या विनापरवाना दारूसाठा दारू तस्करांना दिल्या जात आहे. त्यानंतर तस्करांकडून ही दारू ग्रामीण भागात चढ्या भावाने विकली जात आहे.
जिवती शहरातील देशी दारू दुकानातून दारू ग्रामीण भागामध्ये दिवसा व रात्रीच्या सुमारास पोहोचवली जाते. तसेच ग्रामीण भागात हातभट्टी जोमात सुरू आहे. जिवती शहरातील विदेशी देशी दारू विक्रेत्याकडे व ग्रामीण भागातील हातभट्टी काढणाऱ्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विनापरवाना ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूसाठा पुरवठा केल्याने व ग्रामीण भागातच हातभट्टी काढत असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या दारूविक्री केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय, असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. अवैध दारूविक्रीवर आळा घालून दारू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.