शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:33 IST2019-01-11T00:32:30+5:302019-01-11T00:33:22+5:30
तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

शेकडो शेतकरी उतरले रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तूर व इतर पिकांकरिता खरेदी केंद्र सुरू करून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करावी, यासह विविध मागण्यांसाठी २६ डिसेंबरपासून सुरू असलेले साखळी व आमरण उपोषण पोलीस प्रशासनाने उधळून लावले. उपोषणकर्ते निलेश राठोड यांना रुग्णवाहिकेत फरफटत नेऊन ठाणेदार मंगेश काळे व सहकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. या दडपशाही विरोधात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उपविभागीय कार्यालयावर धडक देत आक्रोश व्यक्त केला.
ठाणेदार काळे व सहकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, या मागणीसाठी दुर्बल पीडित शेतकरी संघटनेकडून गुरुवारी दुपारी १ .३० च्या दरम्यान बालाजी मंदीर येथून स्वप्नील मालके, प्रशांत कोल्हे, उमेश हिंगे, प्रशांत हिंगे, मोरेश्वर झाडे, अमोल लांजेवार, अजय गायकवाड यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसानच्या घोषणा देत मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा उपविभागीय कार्यालय चिमूर येथे धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी जिल्हा परीषद गट नेते डॉ. सतीश वारजुकर, प्रंशांत कोल्हे, स्वप्निल मालके आदींनी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे व तहसीलदार संजय नागटिळक यांनी निवेदन स्वीकारले.