लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पैशांची गुंतवणूक करताना बँक, पतसंस्थेची विश्वासार्हता पाहणे महत्त्वाचे असते. विशेषतः पतसंस्थेचे जर आर्थिक व्यवहार बरोबर नसेल आणि अशा पतसंस्थेत पैसा अडकला की, निघणे मोठे जिकिरीचे व क्लिष्ट काम असते. त्यामुळे संबंधित पतसंस्थेची विश्वासार्हता पाहणे महत्त्वाचे आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३००च्या वर पतसंस्था असून, यातील काही पतसंस्था अगदी व्यवस्थितपणे आर्थिक व्यवहार करीत असून, त्यांची उलाढालही फार मोठी आहे. मात्र, काही पतसंस्थेचे आर्थिक व्यवहार योग्य नसल्याने नागरिकांचा पैसा अडकला आहे.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत नोकरदार पतपुरवठा संस्था, इतर नागरी पतसंस्था (ग्रामीण), इतर नागरी पतसंस्था (नागरी) अशा एकूण तीनशेच्यावर पतसंस्था जिल्ह्यात कार्यरत आहेत. अधिक व्याजदराच्या आमिषाने अनेकजण तसेच बहुतांश सेवानिवृत्त नागरिक त्यांचा पैसा अशा संस्थांमध्ये गुंतवतात. अशा पतसंस्थेत अपहाराचा प्रकार घडल्यास ठेवीदारांचा पैसा परत मिळविण्यासाठी मोठी कसरत होते. पैसा काढण्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांच्या मग पतसंस्थेत चकरा सुरू होत असल्याचा प्रकार दिसून येतो. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे.
गुंतवणूक करताना काळजी घ्याकाही पतसंस्था अवसायनात गेल्याने ठेवीदारांचे पैसे किस्तीमध्ये देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. अधिक व्याजदरामुळे नागरिक पतसंस्थेत रकमेची गुंतवणूक करीत असतात. मात्र, काही वेळा फसगत होण्याची शक्यता असते.
अशा आहे पतसंस्थानोकरदार पतपुरवठा, इतर नागरी पतसंस्था (ग्रामीण), इतर नागरी पतसंस्था (नागरी.)
पतसंस्थांनी जपली विश्वासार्हताजिल्ह्यांतील काही पतसंस्थांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. मात्र, काही पतसंस्था अवसायनात आहेत. यामध्ये ठेवीदारांचा पैसा एकमुस्त न देता किस्तामध्ये देण्यात येत आहे.
देखाव्यापुरते कार्यालयकाहींनी पतसंस्था सुरू करून नागरिकांकडून पैसा गोळा करणे सुरू केले आहे. देखाव्यासाठी कार्यालय सुरू करून ग्राहकांना आमिषही दाखविले जातात.
पतसंस्थांचे व्याजदर जास्तराष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत पतसंस्थांचे व्याजदर जास्त असतात. त्यामुळे अनेकजण पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवण्याला प्राधान्य देतात. सर्वच पतसंस्था वेळेत व्याजासह ठेवीदारांचे पैसे वापस करतात असे नाही.
अनेकांचे पैसे लटकलेजिल्ह्यातील काही पतसंस्था चालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी आपल्या संस्थेत ठेवल्या आहे. मात्र, पैसा देताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी सहकार विभागाकडे तक्रारसुद्धा केली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पतसंस्थेचा अधिक प्रमाणात समावेश आहे.