सारखे नाव-आडनावाचे किती राव !
By Admin | Updated: November 1, 2016 00:56 IST2016-11-01T00:56:58+5:302016-11-01T00:56:58+5:30
सारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही.

सारखे नाव-आडनावाचे किती राव !
बामणी दुधोली येथील प्रकार : निवडणुकीत उद्भवला होता पेच
वसंत खेडेकर बल्लारपूर
सारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र, अवघे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या लहान गावात अशांची संख्या दोन ते पाच पर्यंत असली की त्याला नवलच म्हणावे लागेल. आणि हा नवलाचा प्रकार बल्लारपूर शहराला लागून असलेल्या बामणी (दुधोली) या गावात बघायला मिळतो आहे.
‘साळवे’ असे हे आडनाव! साळवे या आडनावाने व त्यांचे प्रथम नावही सारखे असणारे किती जण तरी गावात आहेत. बामणी येथे साळवे नावांची सुमारे ५० कुटूंब असतील. त्यामुळे, साळवे आडनाव असणाऱ्यांची संख्या निश्चितच दोनशेच्या आसपास असणार! काही साळवे कुटूंबांनी योगायोगाने आपल्या कुटूंबातील मुलांची नावे सारखीच ठेवली आहेत. याच कारणामुळे प्रथम नाव व आडनाव सारखे असे घडत गेले आहे, अशी बरीचशी नाव या गावात आहेत. फरक फक्त त्यांच्या वडिलांची नावे वेगवेगळी आहेत, एवढेच!
उदाहरण द्यायचे झाल्यास या गावात रविंद्र साळवे नावाचे चार जण आहेत. सुरेश व दिनकर साळवे नावाचे प्रत्येकी चार, एकनाथ, वामन, विठोबा, शंकर, नामदेव व गणपती नावाचे प्रत्येकी दोन अशी व्यक्ती आहेत. नावातील या साम्यामुळे बरेचदा गोंधळही उडतो. निवडणुकीत एकाच वार्डात सारख्या नावाचे दोन साळवे उभे झाले की नेमका ‘तो’ साळवे कोण याबाबत मतदारही संभ्रमात पडतात. असा प्रकार निवडणूकीप्रसंगी येथे घडल्याचे जाणकार सांगतात.
या गावात साळवे कुटूंबाची संख्या खूप मोठी असल्याने बामणीला ‘साळवेंची बामणी’ असेही म्हटले जाते. माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते तथा विचारवंत अॅड. एकनाथराव साळवे यांचे हे जन्मगाव! सध्या त्यांचे वास्तव्य याच गावात आहे. आज बामणी (दुधोली) येथे स्थायिक होऊन असलेले सारे साळवे कुटूंब हे मूळचे वर्धा नदीच्या अगदी काठावर रेल्वे पुलाजवळील दुधोली या गावचे होत. नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे दुधोली गाव पुराने वेढला जाऊन घर-जनावरांची हानी होत असे. त्यामुळे शासनाने हे गाव बल्लारपूर-कोठारी मार्गावरील दुधोली या गावालगत त्याला लागूनच पुनर्वसित केले. बामणीचे त्यानंतर बामणी-दुधोली असे नाव पडले. दुधोलीतील सर्व साळवे येथे येऊन वसल्याने साळवे कुटूंबियांची संख्या या गावात सर्वाधिक आहे.
बामणीचे शैक्षणिक-औद्योगिक महत्त्व
सुमारे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्याही महत्त्व आहे. येथे बालाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, जव्हेरी कन्या महाविद्यालय, बी.एड. कॉलेज, मोंटफोर्ट हायर सेकंडरी स्कूल, बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजी (बीआयटी), पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे बीआरसी केंद्र, बामणी प्रोटीन्स, खर्डा फॅक्टरी, आॅईल मिल असे उद्योग येथे आहेत.