अपूर्ण रस्त्यांवर टोलवसुली कशी काय? निर्णयाविरोधात वाहतूकदारांत तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:08 IST2025-09-16T19:06:34+5:302025-09-16T19:08:37+5:30
Chandrapur : कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

How is toll collection on incomplete roads? Transporters express strong displeasure against the decision
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : राजुरा-कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामे अद्याप पूर्ण झालेली नसतानाही, देवघाट टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूकदार, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देत, टोलवसुली तात्काळ स्थगित करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ, शाळा, प्रशासकीय कार्यालये आहेत. यासाठी शेतकरी व नागरिकांना नियमित ये-जा करावी लागते. परंतु सध्या सुरू झालेल्या टोलवसुलीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औजारे ने-आण करताना टोल भरण्याचा भार सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टोल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. शासनाने या टोल नाक्याबाबत चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी व त्यानंतरच कर आकारणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण रखडले
उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण पूर्ण झाले नाही. रस्त्यावर प्रवासात अनेक अडथळे येत असूनही टोल भरावा लागत आहे, ही बाब अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप आबीद अली यांनी केला आहे.
टोल स्थानिकांवर लादल्याचा आरोप
कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वणी, अंतरगाव, वनोजा तसेच तेलंगणा सीमावर्ती मार्गाची स्थितीदेखील अत्यंत दयनीय आहे. खराब रस्ते, अपूर्ण पूल आणि डांबरीकरण न झाल्याने या मार्गावर प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे. अशा स्थितीत टोलवसुली करणे हे वाहतूकदारांच्या आणि प्रवाशांच्या आर्थिक व मानसिक छळासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
अपूर्ण कामांची यादी; पण टोल सुरू
महामार्गावरील अनेक मूलभूत कामे अद्याप प्रलंबित असूनही, टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर उडाणपूल व धामणगाव नाला पूल अपूर्ण, साईडिंग रस्त्यांची कामे अपूर्ण आहे. प्रवासी निवारे, सुरक्षा कठडे, गावफलकांचे अभाव किंवा चुकलेली माहिती असलेला आहे. त्यामुळे दुरुस्ती मागणी करण्यात आली आहे.