चंद्रपूर : पत्नीचा खून करून अपघाताचा बनाव तयार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हर्षा दिनेश ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे. पेशाने शिक्षक असलेला दिनेश रामचंद्र ठाकरे हा गडचिरोली जिल्ह्यातील मुरमाडी येथील रहिवासी आहे. तो नेहमीच त्याची पत्नी हर्षाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करीत असे. ५ जानेवारी २०१४ रोजी आपल्या मुलांना सावली तालुक्यातील चेकपिरंजी येथे नातलगांकडे ठेऊन दिनेशने हर्षाला सोबत घेतले. चंद्रपूर येथे दवाखान्यात जाऊ असे त्याने हर्षाला सांगितले. चंद्रपूर येथे दवाखान्याचे काम आटोपल्यानंतर दिनेश हर्षाला घेऊन पुन्हा गडचिरोलीकडे निघाला. दरम्यान, सावली गडचिरोली मार्गावर त्याने हर्षाला बेदम मारहाण केली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दिनेशने स्वत:च सावली पोलीस ठाण्यात जाऊन हर्षाचा मृत्यू अपघातात झाल्याची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर हर्षाचा खून दिनेशनेच केल्याची बाब उघड झाली. त्यावरून पोलिसांनी दिनेश ठाकरेविरुद्ध भादंवि ३०२, १२० (ब), २०१ अन्वये गुन्हा दाखल केला व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणाचा खटला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. शुक्रवारी या खटल्याचा निकाल लागला. या खटल्यात न्यायमूर्ती के.के.गौर यांनी दोनही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपी दिनेश ठाकरेला दोषी ठरवत जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
By admin | Updated: January 23, 2016 01:05 IST