पोळ्याची मारबत उठतेयं पळसाच्या जीवावर

By Admin | Updated: September 9, 2015 00:56 IST2015-09-09T00:56:10+5:302015-09-09T00:56:10+5:30

‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत ...

With the help of the feces, | पोळ्याची मारबत उठतेयं पळसाच्या जीवावर

पोळ्याची मारबत उठतेयं पळसाच्या जीवावर

पळस संवर्धनासाठी आवाहन : सार्ड, श्रीसंगम, ज्ञानरंजनची जनतेला साद
गोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूर
‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत काढण्याची पूर्वापार परंपरा विदर्भात असली तरी, या परंपरेपायी लक्षावधी पळसांची होणारी कत्तल मात्र निसर्गाच्या दृष्टीने धोकादायक ठरली आहे. हजारो पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी असलेल्या या पळसाच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.
सार्ड (सोशल अ‍ॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट), श्रीसंगम (श्री संत गमाजी महाराज विकास मंडळ, नंदोरी), ज्ञानरंजन चंदनखेडा या सामाजिक संस्थांसह चंद्रपूर वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून या विषयावर जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या जनजागृतीचा एक भाग म्हणून या संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन ‘पळस बचाव अभियान’ उभारले आहे. या अंतर्गत नागरिकांच्या जनजागरणासाठी पत्रके प्रकाशित करून ती नागरिकांना वाटली जात आहेत. या सोबतच, ग्रामीण भागात गावकऱ्यांच्या सभा आयोजित करून पळसाची उपयोगिता पटवून दिली जात असून संवर्धनासाठी आवाहन केले जात आहे.
विदर्भातील ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळी दारासमोर पळसाच्या फांद्या ठेवण्याची परंपरा आहे. या फाद्यांना वाक बांधून गृहिणीकडून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटेलाच त्या पळसाच्या सर्व फांद्या उचलून ‘मारबत’ काढण्याची परंपरा आहे. ही मारबत काढणे म्हणजे ‘माश्या मुरकुटे घेऊन जा गे मारबत’ असे मोठ्याने ओरडण्याचा प्रकार असतो. त्या फांद्या एकमेकाएंवर ठोकत आणि ‘घेऊन जा गे मारबर’ म्हणत गावसीमेबाहेर अथवा परसदारातील खतावर त्या फांद्या नेवून फेकण्याची परंपरा आहे. आताच्या नव्या युगातही घराघरातून ही मारबत काढली जाते, मात्र त्यामागचे कारण कुणालाही माहीत नाही. तरीही परंपरेचा भाग म्हणून आजही या दिवशी पळसाच्या फांद्या आणून दारात ठेवल्या जातात. एका घरी साधारणत: आठ ते दहा फांद्या वापरल्या जातात. या हिशेबाने प्रत्येक कुटूंबात आणल्या जाणाऱ्या फांद्यांची संख्या गणली तर हा आकडा लक्षावधी झाडांवर संक्रांत आणणारा असल्याचे दिसेल. या परंपरेचा फायदा घेऊन शहरात तर अनेक जण ट्रॉली भरभरून पळसाच्या फांद्या आणतात आणि त्यांचा व्यापार करतात. नागरिकही परंपरेचे पालन करायला हवे म्हणून फांद्या विकत घेवून घरोघरी नेतात.

Web Title: With the help of the feces,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.