जनावराला वाचवायला धावला अन् स्वतःचाच जीव गमावला, वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:39 IST2026-03-17T12:37:43+5:302026-03-17T12:39:16+5:30
Chandrapur : शेतात चरणाऱ्या जनावरांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या तरुणावर वाघाने झडप घालत ठार केले. हल्ल्यानंतर वाघाने मृतदेह तब्बल २०० मीटर जंगलात फरफटत नेला.

He ran to save the animal and lost his own life, a young man was killed in a tiger attack
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतात चरणाऱ्या जनावरांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या तरुणावर वाघाने झडप घालत ठार केले. हल्ल्यानंतर वाघाने मृतदेह तब्बल २०० मीटर जंगलात फरफटत नेला. ही थरारक घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील चकनिंबाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३७७ मध्ये सोमवार दि. १६ मार्च रोजी दुपारी १२:३०च्या सुमारास घडली. करण किसन शेडमाके (२१, रा. निंबाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
करण सोमवारी सकाळी दररोजप्रमाणे आपली जनावरे घेऊन चकनिंबाळा शेतशिवारात गेला होता. दरम्यान, दुपारी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक जनावरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे सर्व जनावरांनी हंबरडा फोडला.
आपल्या डोळ्यादेखत जनावरांचा जीव जाताना पाहून करणने आरडाओरड केली आणि वाघाला हुसकावून लावण्याचा धाडसी प्रयत्न केला. मात्र, चवताळलेल्या वाघाने जनावरांना सोडून थेट करणवर झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात करणचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एसीएफ साकेत वाटोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
अवघ्या सहा दिवसांपूर्वी, १० मार्च रोजी मामला जंगलातही वाघाने एका इसमाला ठार केले होते. पाठोपाठ घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे निंबाळा आणि परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.