लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉड, फसवणूक, हॅकिंग अशा घटनांमध्येदेखील वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाईन किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्राधान्य दिले जात आहे. ऑनलाईन व्यवहार वाढण्यासाठी सरकार आणि बॅंकिंग क्षेत्रदेखील नागरिकांना प्रोत्साहन देत आहेत. कोरोनाकाळात असे व्यवहार वाढले आहेत. स्मार्टफोनमध्ये अनेकांचे बॅंक खात्याशी लिंक टच आहे. त्याआधारावर अनेकजण व्यवहार करतात. याचाच फायदा घेत अनेक सायबर चोरटे ऑनलाईन फ्रॉड, फसवणूक करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्या बॅंक खात्यासंदर्भातील माहिती कुणालाही देऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन व्यवहार करताना संपूर्ण पडताळणी करूनच करावा, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाकाळात प्रकार वाढले
कोरोना काळात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला. यात काही संधिसाधू लोकांनी याचा चांगलाच गैरफायदा उचलला. विविध शक्कल लढवून बॅंकेच्या खात्यातील रक्कम कशी वळती करण्यात येईल. याचाही अभ्यास या चोरट्यांनी केल्याचे अतापर्यंत घडलेल्या घटनांवरुन दिसून येत आहे.
कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांना सतर्कता बाळगावी. कोणतीही लिंक व साईट ओपन करताना संपूर्ण शाहनिशा करावी. बॅंकेचे अधिकारी बोलतोय अशी बतावणी करुन कुणी खात्यासंदर्भात माहिती विचारत असल्यास कोणतीही माहिती देऊ नये, बॅंक अधिकारी फोन करुन कधीच खात्यासंदर्भातील माहिती विचारत नाही. कोणताही संदेश किंवा मेसेज आल्यास त्याची खातरजमा करावी.-कमलेश जैस्वाल, पोलीस निरीक्षक सायबर क्राईम