गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

By Admin | Updated: May 7, 2015 00:58 IST2015-05-07T00:58:24+5:302015-05-07T00:58:24+5:30

गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे.

Goygaon residents have to drink tea and black water | गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

गोयेगाववासीयांना प्यावे लागते काळे पाणी

गोवरी : गोवरी डीप कोळसा खाणीतील शक्तीशाली ब्लॉस्टिंगने गोयेगाव येथील बोअरवेलचे खड्डे खचत चालले आहे. त्यामुळे निघणारे पाणी हे कोळशासारखे काळे आहे. या काळ्या दूषित पाण्यामुळे गोयेगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून कोळसा खाणींचा नाहक फटका गावकऱ्यांना बसत आहे.
राजुरा शहरापासून १० कि.मी. अंतरावरील गोयेगाव हे जेमतेम ९०० लोकसंख्या असलेले गाव. गावात जाताना वळणवाटेने या गावात प्रवेश करावा लागतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून १ ते ७ पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या परिसरातील जमीन काळी कसदार आणि अतिशय सुपीक आहे. मात्र या परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहनाची प्रक्रिया पूर्ण करून गोयेगाव गावालगत दोन-तीन वर्षापूर्वी गोवरी डीप ही खुली कोळसा खाण सुरू केली.
कोळसा उत्खननासाठी खाणीत शक्तीशाली ब्लॉस्टींग केले जाते. या ब्लॉस्टींगची क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात असते की भूकंप झाल्यासारखी घरे हलू लागतात. बोअरवेलचे खड्डे ब्लॉस्टींगने खचू लागल्याने त्यातून निघणाऱ्या काळ्या पाण्यावर गोयेगाववासीयांना आपली तहान भागवावी लागत आहे. गोयेगाव येथील पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने येथे गेल्या अनेक वर्षांपूर्वी जलशुद्धीकरण टाकी लावण्यात आली. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र शासनाचे काम वर्षानुवर्षे थांबलेलेच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जलशुद्धीकरणाकरिता लावलेली टाकी निकामी झाली असून ती आता शोभेची वास्तू ठरली आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर जलशुद्धीकरणाचा लाभ गावकऱ्यांना झाला असता. शुद्ध पाण्यापासून गोयेगाववासीय जनता वंचित झाल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना फ्लोराईयुक्त व काळ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. कोळसा खाणींचा नाहक फटका गोयेगाववासीयांना बसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले शेणखतांचे ढिगारे येणाऱ्या - जाणाऱ्या वाटसरूंच्या स्वागतासाठी उभे आहे. पावसाळ्यात मुख्य रस्त्यावर शेणखताची दुर्गंधी अस्वस्थ करणारी ठरत असतानाही ते ढिगारे हटविण्याचे सौजन्य ग्रामपंचायतींने दाखविले नाही. गावातील रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेल्या नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. मात्र गावाच्या विकासाप्रति उदासीन असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला गावकऱ्यांच्या आरोग्याशी काही देणेघेणे नसल्याचे नेहमी दिसून येत आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Goygaon residents have to drink tea and black water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.