मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपुरात आदिवासींची धरणे
By Admin | Updated: February 29, 2016 00:37 IST2016-02-29T00:37:21+5:302016-02-29T00:37:21+5:30
येथील नगर परिषद चौकात आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांकरिता शुक्रवारी धरणे आंदोलन केले.

मागण्यांच्या पूर्ततेसाठी बल्लारपुरात आदिवासींची धरणे
बल्लारपूर : येथील नगर परिषद चौकात आदिवासी बांधवांनी आपल्या मागण्यांकरिता शुक्रवारी धरणे आंदोलन केले.
राजे खांडक्या बल्लारशाह महाराज यांच्या समाधीस्थळाची नोंद पुरातत्व विभागाने करावी, समाधीस्थळाच्या मार्गावर प्रवेशद्वार उभारावे, बिरसा मुंडा स्मृतीस्थळाची जागा संस्थेला मिळावी, रमाई घरकूल योजनेसारखी आदिवासींची घरकूल योजना नगरपालिकांंतर्गत राबविण्यात यावी या व इतर मागण्यांकरिता येथील आदिवासी उलगुलान संघर्ष संस्था, अ.भा. क्रांतीवीर नारायण सिंह उईके संघर्ष समिती, बिरसा मुंडा आदिवासी महिला मंडळ, निसर्ग आदिवासी महिला बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे मंडपात झालेल्या भाषणात प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी या आंदोलनामागील भूमिका मांडली. तदवतच, आदिवासींच्या कोणत्या व्यथा, वेदना व समस्या आहेत, याकडे शासन गांभीर्याने लक्षच देत नाही, असा आरोप करीत आदिवासींच्या हक्कावर घाला घालू नका त्यांची दखल घ्या, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. सुनील कुमरे, संतोष आत्राम, मिनाक्षी गेडाम, लिना कुसराम, सुनील कोवे, भारत थुलकर, गणेश मेश्राम, सचिन मरसकोल्हे, सुनंदा आत्राम, नगराध्यक्ष छाया मडावी यांचीही भाषणे झालीत. मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, मुख्याधिकारी विपीन मुदधा यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)