बनावट स्वाक्षरी करणारा सूत्रधार फरार, अटकेसाठी आठ पोलिसांचे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:13+5:302021-09-17T04:34:13+5:30
चंद्रपुरातील सुरजनाथ कोडापे आणि राजुरा येथील नितीन सदाशिव घोरपडे यांनी बनावट स्वाक्षरीने लाखोेंनी गंडविल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केल्यानंतर प्रशासनानेही ...

बनावट स्वाक्षरी करणारा सूत्रधार फरार, अटकेसाठी आठ पोलिसांचे पथक
चंद्रपुरातील सुरजनाथ कोडापे आणि राजुरा येथील नितीन सदाशिव घोरपडे यांनी बनावट स्वाक्षरीने लाखोेंनी गंडविल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केल्यानंतर प्रशासनानेही कागदपत्रांसह तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बल्लारपुरातील सरदार पटेल वॉर्ड, सास्ती रोड येथील आरोपी ब्रिजेशकुमार झा याच्याविरुद्ध भादंवि ४६५, ४६८, ४७९, ४२० अन्वये गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याचे समजले. वरिष्ठांच्या आदेशानुसार रामनगर पाेलिसांनी आठ जणांचे विशेष पथक तयार केले. या पथकाने शुक्रवारपासून आरोपीचा शाेध सुरू केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहायक व परिचरपदांची भरती नसताना आराेपीने बनावट जाहिरातीच्या आधारावर लाखोंची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरविले आणि तसा आदेशही त्यांना दिला होता. या युवकांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर हे बनावट प्रकरण उघडकीस आले.
कोट
जिल्हा परिषदेत नोकरी देण्याच्या नावावर युवकांना फसविल्याची तक्रार आल्यानंतर गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. आरोपीच्या अटकेसाठी आठ जणांचे एक विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.
- विनोद बुरले, पोलीस उपनिरीक्षक रामनगर, चंद्रपूर
बॉक्स
नोकरीच्या फसव्या आमिषाला बळी पडू नका- सीईओ डॉ. सेठी
नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव व बनावट स्वाक्षरी वापरल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सरकारी नोकरी लावून देतो, अशा स्वरूपाच्या कोणत्याही फसव्या आमिषाला बळी पडू नये. प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी केले आहे.