संतप्त गावकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:43 IST2017-12-07T23:42:48+5:302017-12-07T23:43:04+5:30
तालुक्यातील शिरसी येथे ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी खुशी हजारे या चार वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरातून नेले. या घटनेला तब्बल एक महिना लोटला.

संतप्त गावकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा
आॅनलाईन लोकमत
सावली : तालुक्यातील शिरसी येथे ६ नोव्हेंबरच्या सायंकाळी खुशी हजारे या चार वर्षीय चिमुकलीला बिबट्याने घरातून नेले. या घटनेला तब्बल एक महिना लोटला. तरीही त्या गाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सावली येथील वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.
सदर घटनेच्या आधीपासूनच बिबट्याने गावातील कोंबड्या, बकऱ्यांना मारून दहशत माजविली होती. त्यातच खुशीचे प्रकरण घडले. एक महिना लोटूनही वनविभागाकडून कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे शिरसी येथील संतप्त नागरिक येथील वनविभागाच्या कार्यालयावर धडकले. नगरपंचायतच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यात नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा. गावाच्या सभोवताल पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे. पीडित कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, यासह अनेक मागण्यांचे निवेदन वनविभागाला देण्यात आले. दरम्यान, सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.व्ही. धाडे यांनी ग्रामस्थांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठांना बोलविल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने उपविभागीय वनसंरक्षक राजन तलमले यांना तिथे हजर व्हावे लागले. त्यांनी ग्रामस्थांचे समाधान करीत शुक्रवारी पिंजरा लावण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी शांत झाले.