लोकमत न्यूज नेटवरचंद्रपूर : जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या दोन मोठ्या कामांच्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये खोटे आणि बनावट दस्तऐवज सादर करून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रकुमार महाजन उके, रा. नगीनाबाग, चंद्रपूर याच्यावर रामनगर पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा जलसंधारण अधिकारी निलीमा मंडपे यांनी तक्रार दाखल केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २०१८ च्या शासन निर्णयानुसार, निविदा प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांची सादरीकरण करणे हे गंभीर फौजदारी गुन्हा मानले जाते. जिल्हा जलसंधारण अधिकारी निलीमा मंडपे यांनी रामनगर पोलिसमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने जलसंधारण विभाग तसेच कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली असून पुढे काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निविदा प्रक्रियेत केला होता गैरप्रकार
- इंद्रकुमार उके यांनी यांनी ई-निविदा सादर करताना वार्षिक आर्थिक उलाढालीची बनावट माहिती सादर केली होती. त्यांनी सनदी लेखापालाच्या खोट्या सही-शिक्यासह २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत उलाढाल वाढवून दाखवली.
- यामुळे त्यांची बिड क्षमता अधिक दाखविण्यात आली. प्रत्यक्षात जीएसटी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची आर्थिक उलाढाल ही सादर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी होती. या बनावट कागदपत्रांच्या आधारे उके यांना दोन मोठ्या कंत्राटांतर्गत कोट्यवधी रुपये अदा करण्यात आले.
- मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर अंतर्गत मौजा बोरगाव, वडकुली, चिवंडा, चकबेरडी आणि आर्वी, वामनपल्ली, पाचगाव-१, तोहगाव-२, सोनुर्ली या गावांमध्ये गेटेड बंधारे आणि साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. या दोन्ही निविदांमध्ये इंद्रकुमार उके यांनी कंत्राट मिळवले होते. या कामांसाठी अनुक्रमे ४.७७ कोटी व ४.०९ कोटी एवढ्या किमतीच्या निविदा मंजूर झाल्या होत्या. काम मिळविण्यासाठी उके यांनी आर्थिक वर्षाची उलाढाल प्रमाणापेक्षा अधिक दाखवून दिशाभूल केली.