माजी आमदार व ज्येष्ठ समाजसेवक अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 02:35 PM2021-03-13T14:35:00+5:302021-03-13T14:38:47+5:30

Chandrapur News माजी आमदार व ज्येष्ठ समाजसेवक अ‍ॅड. एकनाथ साळवे यांचे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

Former MLA and senior social worker Adv. Eknath Salve passes away | माजी आमदार व ज्येष्ठ समाजसेवक अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे निधन

माजी आमदार व ज्येष्ठ समाजसेवक अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: माजी आमदार व ज्येष्ठ समाजसेवक अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. एन्काऊंटर ही त्यांची नक्षल चळवळीशी संबंधित कादंबरी बरीच गाजली होती.

ध्‍येयवादी समाजसेवक हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार
 
माजी आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांच्‍या निधनाने ध्‍येयवादी समाजसेवक हरपल्‍याची प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.
लोकप्रतिनिधी या नात्‍याने एकनाथराव साळवे यांनी जनतेच्‍या विविध प्रश्‍नांची सोडवणूक करत या जिल्‍हयाच्‍या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या विचारांवर त्‍यांची निस्‍सीम श्रध्‍दा होती. राजकीय मतभेदाच्‍या भिंती बाजूला सारून त्‍यांनी नेहमीच सर्व पक्षातील कार्यकर्त्‍यांवर व नेत्‍यांवर स्‍नेह केला व त्‍या माध्‍यमातुन माणसे जोडण्‍याची किमया साधली. त्‍यांच्‍या या गुणवैशिष्‍टयाच्‍या बळावर मोठा लोकसंग्रह त्‍यांनी निर्माण केला. दुरध्‍वनी व पत्रव्‍यवहाराच्‍या माध्‍यमातुन मला नेहमी त्‍यांची कौतुकाची थाप मिळायची. तत्‍वनिष्‍ठता हे एकनाथराव साळवे यांचे बलस्‍थान होते. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्‍दात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकभावना व्‍यक्‍त केल्‍या आहेत. 

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या मुलाखतीचा  साहित्य संमेलनादरम्यान डॉ. विद्याधर बन्सोड यांनी एकनाथराव साळवे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीचा सारांश देत आहोत

 माझा जन्म १९३६ मध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शैक्षणिक कार्यात जेमतेम परिस्थितीमुळे अडचणी आल्या. त्यावेळी आईची मोलाची साथ लाभली. केवळ शेतीच्या बळावर उदरनिर्वाह चालायचा. शेती व्यवसाय कृषी संस्कृती म्हणून असल्याने त्यावरच आजवरची जडणघडण झाली. कोणतेही कार्य कोणा एकाचे नाही. ते सामुहिक जबाबदारीचे आहे. सेवादलाचे कार्य सामाजिक बांधिलकीचे व प्रामाणिक आहे. आजही त्यात बदल झाला नाही. परंतु, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने काहिसे दुर्लक्ष केल्यामुळे सेवादलाच्या कार्यकर्त्यात काहीशी निराशा आहे.  मी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे ११ वर्षे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी माझेकडे सहा हजाराचे एक वाहन व सायकलवर फिरणारे जीवाभावाचे कार्यकर्ते होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मा.सा. कन्नमवार माझे राजकीय गुरु होते. त्यावेळची राजकीय प्रतिमा प्रामाणिकपणाची होती. आताचे राजकारण भ्रष्टाचार व अप्रमाणिकतेने बरबटले आहे.
एनकाऊंटर कादंबरीच्या माध्यमातून उपेक्षितांचे वास्तव जीवन दर्शविण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामविष्ट करण्यात आली. शोषितविरहीत समाज रचना मांडण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे जाण्याचा योग मला आला. जाती व्यवस्थेवर प्रहार म्हणून ते धर्मांतर होते. तेव्हापासून मला तथागत बुद्धाचा धम्म न्याय देणारा, समता बाळगणारा म्हणून स्वत:ला जोडून घेतला. धम्माचे कार्य आचरणात आणून समाजकार्यात सक्रीय आहे.
आजघडीला संगणकाचे युग आहे. दूरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बीभत्सतेचे दर्शन घडविले जाते. याचा विपरीत परिणाम तरुण पिढीवर होत आहे. यातून सावरण्यासाठी विधायक व प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी रुजविण्याची आवश्यकता आहे. 

 

 

Web Title: Former MLA and senior social worker Adv. Eknath Salve passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू