ग्रंथालयाला आले महाविद्यालयाचे स्वरुप

By Admin | Updated: February 27, 2016 01:24 IST2016-02-27T01:24:49+5:302016-02-27T01:24:49+5:30

सध्या बेरोजगारी ज्वलंत प्रश्न आहे. रोजगारासाठी बेरोजगारांची वाट्टेल ते करायची तयारी आहे. याचाच परिपाक असा की आज गल्लीबोळात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग फोफावले आहेत.

The form of a college came to the library | ग्रंथालयाला आले महाविद्यालयाचे स्वरुप

ग्रंथालयाला आले महाविद्यालयाचे स्वरुप

दिवसभर रेलचेल : वाचन संस्कृतीला दिली जातेयं चालना
रवी जवळे चंद्रपूर
सध्या बेरोजगारी ज्वलंत प्रश्न आहे. रोजगारासाठी बेरोजगारांची वाट्टेल ते करायची तयारी आहे. याचाच परिपाक असा की आज गल्लीबोळात स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग फोफावले आहेत. महागडे शुल्क आकारून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले जाते. मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत व हुशार विद्यार्थी अंगात कुवत असतानाही या महागड्या क्लासेसच्या पायरीवरही चढू शकत नाही. परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी येथील जिल्हा ग्रंथालय भक्कम आधार ठरले आहे. या ग्रंथालयात अशा होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना ग्रुप अभ्यासाची सोय, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, मार्गदर्शन व बसण्याच्या व्यवस्थेसह इतर सुविधा मोफत पुरविल्या जात आहे. त्यामुळे या ग्रंथालयाला आता चक्क महाविद्यालयाचे स्वरुप आलेले दिसते.
पूर्वी पदवी संपादन केली की मुलाखतीनंतर सरळ नोकरी मिळत असायची. मात्र अलिकडच्या दशकात लोकसंख्या वाढीमुळे हे समिकरणच बाद झाले. लोकसंख्या वाढली, बेरोजगारी वाढली, त्यामुळे स्पर्धा आली. आता ड वर्गाची नोकरी मिळविण्यासाठीदेखील लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, मुलाखत अशा दिव्यांना पार करावे लागते. या परीक्षांसाठी वेगळा अभ्यास हवा. त्यासाठी ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाले. आता हे मार्गदर्शन केंद्र महागड्या क्लासेसच्या रुपात दिमाखात उभे आहे. महागडे शुल्क आकारून येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले जाते. मात्र सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी वर्ष-दोन वर्षापर्यंत येथील शुल्काचा बोजा पेलू शकत नाही. आणि त्यांना सर्वगुणसंपन्न असतानाही अशा शिकवणी वर्गापासून वंचित रहावे लागत आहे. येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोरे यांना ही बाब लक्षात आली. ज्यांना खरंच स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हायचे आहे, त्यांच्यासाठी आपल्या ग्रंथालयातच तशी सोय निर्माण करून दिली. प्रारंभी दहा-विस विद्यार्थी ग्रंथालयात अभ्यासासाठी येऊ लागले. याच ठिकाणी त्यांना स्टडी सर्कल, युनिक अ‍ॅकेडमी, के.सागर यासारखी स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. अतिशय शांत वातावरण, ग्रुप अभ्यासातून मिळणारे मार्गदर्शन या बाबी मिळू लागल्याने विद्यार्थ्यांचा ओढाही वाढू लागला. ड वर्गापासून अ वर्गापर्यंतच्या सर्व पदाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता दररोज तब्बल दोनशे ते अडीचशे विद्यार्थी या ग्रंथालयात बसून अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढत आहे. बसण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. तरीही जिल्हा ग्रथालय अधिकारी राजेश कोरे आपल्या परीने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
वास्तविक उगाच कशाला ही ‘झंझट’ म्हणून ग्रंथालय अधिकाऱ्यांना यातून आपले हात झटकता आले असते. मात्र आपल्या ग्रंथालयात बसणारा विद्यार्थी उद्या सनदी अधिकारी व्हावा, अशी मनोमन इच्छा असल्याने कोरे हे अतिशय व्यस्त असतानाही विद्यार्थ्यांच्या सोईसुविधांसाठी झटत आहेत. एकही विद्यार्थी उभा राहू नये म्हणून त्यांनी आपल्या केबीनमधील खूर्च्याही विद्यार्थ्यांसाठी देऊन टाकल्या आहेत. या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून ते स्वत: बारकाईने लक्ष देऊन असतात. शुल्क नसलेल्या या छोटेखानी महाविद्यालयाचा डोलारा सांभाळत असतानाही कोरे यांनी वाचन संस्कृतीलाही चालना दिली आहे. या ग्रंथालयात कथा, कादंबरी, आत्मचरित्र, धर्मग्रंथ यासारख्या पुस्तकांचा भंडारच आहे. या ग्रंथालयाचे तब्बल १ हजार ७०० वैयक्तिक सभासद आहेत. नियमितपणे या सभासदांकडून विविध पुस्तकांची मागणी होते आणि ती मागणी पुरविली जाते. येथे येणाऱ्या प्रत्येकाला मागेल ते पुस्तक अतिशय नम्रपणे पुरविले जाते. आताच त्यांनी भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करून वाचन संस्कृतीला बळकट केले आहे.

Web Title: The form of a college came to the library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.