निलंबनाच्या कारवाईनंतर आता बदल्यांचे सत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 05:00 IST2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:41+5:30
मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर जाण्यास तयार नाही. त्यामुळे महामंडळाने १०० कामगारांची सेवा समाप्ती केली. तर ९६ जणांचे निलंबन केले. तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

निलंबनाच्या कारवाईनंतर आता बदल्यांचे सत्र सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनात विलीनीकरणासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे महामंडळाने १०० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती तर ९६ जणांचे निलंबन केले होते. तरीही कर्मचारी संपावर येत नसल्याने आता महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू केले आहे. शनिवारी चंद्रपूर डिव्हिजनमधील आठ जणांची बदली करण्यात आली असल्याची माहिती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच डेपो येतात. त्यापैकी ब्रह्मपुरी डेपो हे गडचिरोली जिल्ह्यांतर्गत येते. तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये चंद्रपूर, राजुरा, वरोरा, चिमूर डेपोचा समावेश येतो. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये एकूण १३७२ कर्मचारी आहेत. मात्र, मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्यावर जाण्यास तयार नाही. त्यामुळे महामंडळाने १०० कामगारांची सेवा समाप्ती केली. तर ९६ जणांचे निलंबन केले. तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.
त्यामुळे आता महामंडळाने या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी चंद्रपूर डिव्हिजनमधील प्रशासकीय विभागातील आठ जणांची बदली करण्यात आली आहे. मात्र, तरीसुद्धा कोणतेही कर्मचारी कामावर गेले नाही. महामंडळ कर्मचाऱ्यांमुळे संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
शाळेत जाण्यास विद्यार्थ्यांना अडचण
कोरोनानंतर दोन वर्षांनंतर पहिली ते पाचवीच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. मात्र, महामंडळाचा संप सुरू असल्याने बसफेऱ्या बंद आहेत. ग्रामीण भागात खासगी बसफेऱ्या धावत नसल्याने या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास मोठी अडचण होत आहे. यासोबत ज्येष्ठ व इतर प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खासगी वाहनाकडून लूट
कोरोनामुळे अनेक रेल्वे बंद आहेत. त्यानंतर महामंडळाच्या बसफेऱ्या बंद आहेत. परिणामी, खासगी ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत आहे. मात्र, हे खासगी वाहनधारक वारेमाप पैसे घेत आहेत; परंतु प्रवाशांना इतर कुठलेही साधन नसल्याने खासगी वाहनाचा वापर करावा लागत आहे.