चंद्रपुरात फुलला गावरान रानभाज्यांचा मेळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:00+5:30
यामध्ये प्रामुख्याने कुकुडा, धान, चुचरी, आंबाडी, गोपीन, बांबू कोम, धोपा अर्थात अळू, मसाले पान, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, अळू, तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ, करटोली, वाघेटी, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा इत्यादी रानभाज्यांची ओळख या महोत्सवात झाली.

चंद्रपुरात फुलला गावरान रानभाज्यांचा मेळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कृषी विभागाअंतर्गत येथील आत्मा कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी एक दिवसीय रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळणाºया रानभाज्यांचा जणू मेळाच भरला होता.
रोजच्या आहारात रानभाज्यांचा समावेश होऊन आरोग्य संवर्धन व्हावे, रानभाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, या हेतूने जिल्ह्यात रानभाजीच्या वितरण व्यवस्थेसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारू, असे आश्वासन यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी दिले.
यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या फलोत्पादन विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ.सोनाली लोखंडे उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले. संचालन मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड तर आभार रवींद्र मनोहरे यांनी मानले.
जवळपास ६० रानभाज्यांचे प्रदर्शन
रानभाजी महोत्सवात शेतकºयांनी जवळपास ६० रानभाज्यांची ओळख व विक्री व्हावी, यासाठी प्रदर्शनात उपलब्ध करण्यात आल्यात. यामध्ये प्रामुख्याने कुकुडा, धान, चुचरी, आंबाडी, गोपीन, बांबू कोम, धोपा अर्थात अळू, मसाले पान, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, अळू, तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ, करटोली, वाघेटी, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड, कुडा, शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा इत्यादी रानभाज्यांची ओळख या महोत्सवात झाली.
३० पेक्षा अधिक स्टॉल
जिल्ह्यातील आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट, शेतकरी, उमेद अंतर्गत येणारे विविध महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ३० पेक्षा अधिक रानभाज्यांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. रानभाज्यांपासून बनवलेले विविध पदार्थसुद्धा या महोत्सवात उपलब्ध होते. जिल्ह्यातील नागरिकांनी रानभाजी महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन रानभाज्या यावेळी खरेदी केल्यात.