निवृत्त वनाधिकाऱ्याने सोडला वीज प्रवाह; शेतकऱ्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 11:55 AM2023-09-21T11:55:36+5:302023-09-21T11:57:13+5:30

विजेच्या धक्क्याने रानडुकराचाही मृत्यू : निवृत्त वनाधिकारी लेनेकरला अटक

Farmer dies in electric current left in fence by retired forest officer | निवृत्त वनाधिकाऱ्याने सोडला वीज प्रवाह; शेतकऱ्याचा बळी

निवृत्त वनाधिकाऱ्याने सोडला वीज प्रवाह; शेतकऱ्याचा बळी

googlenewsNext

नागभीड (चंद्रपूर) : शेतीच्या संरक्षणासाठी जिवंत वीज प्रवाहाचा उपयोग न करता सोलर प्रणालीचा वापर करा, अशी जनजागृती वन विभागाकडून सुरू असताना निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने आपल्या शेतातील कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाने नागभीड येथील शेतकऱ्याचा तडफडून मृत्यू झाल्याची भीषण घटना बुधवारी चिखलपरसोडी शिवारात उघडकीस आली. गुरुदेव श्रीहरी पिसे (५२, रा. नागभीड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण दामोधर लेनेकर यांना आज अटक केली.

नागभीड येथील मृत शेतकरी गुरुदेव पिसे आणि आरोपी वनाधिकारी नारायण लेनेकर यांची धानाची शेती चिखलपरसोडी शिवारात एकमेकाला लागून आहे. मंगळवारी सांयकाळी गुरुदेव पिसे हे आपल्या शेतातील पीक बघण्यासाठी शेतात गेले होता. मात्र, घरी परत आले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री ८ वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर शेतात जाऊन पाहणी केली; पण अंधारामुळे काहीच दिसून आले नाही. कुटुंबाने बुधवारी सकाळी पुन्हा शेतात जाऊन शोध घेतला असता गुरुदेव पिसे यांचा मृतदेह वीज तारांमध्ये आढळला.

आरोपी वनाधिकाऱ्याच्या शेतातून तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह सोडल्याचे दिसून आले. या तारांजवळ एक रानडुकरही ठार झाल्याचे दिसून आले. हे भीषण दृश्य पाहताच क्षणी कुटुंबीय हादरले. त्यांनी लगेच ही माहिती पोलिस, महावितरण व वनविभागाला दिली. काही वेळातच तिन्ही विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपी निवृत्त वनाधिकारी नारायण लेनेकर यांच्याविरूद्ध भादंवि ३०४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आज नागभीड न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वनविभागानेही आरोपीविरुद्ध कलम ९,३९,४१ अन्वये गुन्हा दाखल केला. महावितरण विभागाने या घटनेचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.

नोकरीत असताना वाटले लोकांना ब्रह्मज्ञान

वन विभागात नोकरी करताना वन्यजीव, वनसंपदा, पीक आणि शेतकरी यांची काळजी घेण्याबाबत वारंवार प्रशिक्षण दिले जाते. वन परिक्षेत्र अधिकारीसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याची तर यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. समाज त्यांच्याकडे आदराने बघतो सेवेत असताना हे अधिकारी लोकांना ब्रह्मज्ञान वाटत असतात. मात्र, वन विभागातील निवृत्त वनाधिकाऱ्याच्या अक्षम्य चुकीने शेतकऱ्याचा हकनाक बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

'त्या' आरोपीलाही अटक

मंगळवारी विजेच्या धक्क्याने देवनाथ रामदास बावनकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दुर्गेश रामकृष्ण सहारे (१८, रा. नागभीड) याला अटक केली. आरोपी दुर्गेश सहारे याने पिकांसाठी कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. शेजारीच शेतकरी देवनाथ बावनकर शेतात गेला असता तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी दुर्गेश सहारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

शेतकऱ्यांनी शेतीच्या संरक्षणासाठी जिवंत विद्युत प्रवाहाचा उपयोग न करता सोलर प्रणालीचा वापर केला पाहिजे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभाग लवकरच तालुक्यातील शिवारात शोध मोहीम राबवणार आहे.

- योगेश घारे, ठाणेदार नागभीड

Web Title: Farmer dies in electric current left in fence by retired forest officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.