चिडे कुटुंबीयांना मिळणार ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:00 IST2018-12-13T23:58:50+5:302018-12-14T00:00:06+5:30

नागभीड येथे दारू विके्रत्यांशी लढा देताना मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन, नुकसान भरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे कुटुंबीयांना दिलेला शब्द पूर्ण केला असून मंगळवारी राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे ज्ञापन प्रसिद्ध केले आहे.

Families to get full salary for 58 years | चिडे कुटुंबीयांना मिळणार ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन

चिडे कुटुंबीयांना मिळणार ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन

ठळक मुद्देराज्यातील पहिलीच घटना : सुधीर मुनगंटीवार यांच्या आश्वासनाची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड येथे दारू विके्रत्यांशी लढा देताना मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन, नुकसान भरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे कुटुंबीयांना दिलेला शब्द पूर्ण केला असून मंगळवारी राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे ज्ञापन प्रसिद्ध केले आहे. अशा पध्दतीने मृत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळण्याची महाराष्ट्रातील ही प्रथमच घटना आहे.
गृह विभागाच्या २९ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने छत्रपती चिडे यांच्या कुटुुंबीयांना नुकसान भरपाई व इतर सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्षलवादी कारवाईसह अतिरेकी कारवाई, दरोडेखोरी, संघटीत गुन्हेगारी विरोधी कारवाई व आपात्कालीन काळात मदत करताना मृत तसेच जखमी झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई व इतर सोयी सुविधा देण्याबाबतची तरतूद आहे. मृत किंवा जखमी झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मृत व्यक्तीला त्याच्या मृत्युच्या वेळी देय असलेले अंतिम वेतन, मृत व्यक्तीच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत देय असेल. मृत पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनावर नियमानुसार वेळोवेळी महागाई भत्ता ज्या दराने देय होईल, त्या दराने मिळेल. तसेच असे मिळणारे वेतन सुधारित वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेळोवेळी सुधारित होणार आहे.
पाठिशी शासन खंबीरपणे उभे - मुनगंटीवार
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी चिडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना परिपत्रकाची प्रत सुपूर्द केली. दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांनी कर्तव्य बजावताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द आपण चिडे कुटुंबीयांना दिला होता. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई व इतर लाभ मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. या प्रकरणी २९ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयातील तरतुदी लागू होत नव्हत्या. मात्र आपण मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार असे एकूण १६ लाख रुपयांची मदत चिडे कुटुंबीयांना दिली आहे. चिडे यांच्या मुलाला वयाच्या १८ वर्षानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीसुद्धा देण्यात येईल, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले. समाजाची सेवा करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Families to get full salary for 58 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.