लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : पती-पत्नी यांच्यातील घरगुती भांडण सोडविण्यासाठी पोलीस गेले. मात्र चौकशीनंतर पोलिसांना वेगळेच प्रकरण हाती लागले आणि बनावट लग्न करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. घटनेतील नकली वधू व नकली मावशी, नकली काका व लग्न जुळवून देणारे एजंट अशा चार आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. विसापूर येथील ईश्वर कुळमेथे यांच्या मुलीचे लग्न राजस्थान येथे झाले. या दिवाळीला ती आपला दीर राजेंद्रसिंग याला लग्न करून देण्यासाठी सोबत घेऊन आली. लग्नासाठी पैसे हवेत असे ईश्वर कुळमेथे यांनी आपल्या मुलीला सांगितले. कुळमेथे यांच्या राजस्थान येथील जावयाने पैसे पाठविले. ते काढण्यासाठी कुळमेथे बँक ऑफ बडोदा येथे गेले असता पैसे काढताना त्याच्या बाजूला आरोपी सोनू बोरकर उभा होता. त्याने एवढे पैसे काढण्याचे कारण विचारले. जावयाच्या भावाचे लग्न जुळवून द्यायचे आहे, असे सांगितल्यानंतर बोरकर कट रचला.
असे फुटले बिंग
- २६ नोव्हेंबरला सायंकाळी लग्न (बनावट) झाल्यानंतर नवरी झालेली प्रेमलता ही घराबाहेर फिरायला जाते म्हणून बाहेर पडली. त्यानंतर ती दुसऱ्याच्या दुचाकीवर बसून पळायला लागली. तिचा नवरा राजेंद्रसिंग याने आरडाओरड करून पकडले. घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसांना करताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून चौकशी केली. तेव्हा पैशासाठी लग्नच बनावट केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सोनू बोरकर, व्यंकटेश राधांडी, प्रेमलता उमरे उर्फ सीमा बरमन आणि किरण उर्फ ज्योत्सना सुखदेवे यांना अटक केली.
असे रचले नाटक
लग्नासाठी एक मुलगी आहे. असे सोनू बोरकर याने कुळमेथे यांना सांगून व्यंकटेश राधांडी याला विसापूर येथे घेऊन गेला व मुलीची मावशी आजारी आहे. तिला ७५ हजार लागणार आहे. आधी पैसे द्या, नंतर लग्न करून देऊ, असे सोनू बोरकर याने कुळमेथे यांना सांगितले. पैसे दिल्यानंतर लग्न लागले. प्रेमलता उमरे उर्फ सीमा बरमन ही नवरी झाली. किरण उर्फ ज्योत्सना सुखदेवे मावशी तर व्यंकटेश राधांदी हा काका झाला.