मृतदेह घरात तरीही सावकार येतो दारात, बेकायदेशीर सावकारीचा अमानवी चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:41 IST2025-12-29T15:40:21+5:302025-12-29T15:41:28+5:30
३० ऑगस्ट २०२२ रोजी रोशन कुळे यांच्या आजीचे निधन झाले. संपूर्ण कुटुंब शोकाकुल अवस्थेत असतानाच सकाळीच सावकार प्रदीप रामभाऊ बावनकुळे यांचा पैशांसाठी निरोप आला.

मृतदेह घरात तरीही सावकार येतो दारात, बेकायदेशीर सावकारीचा अमानवी चेहरा
घनश्याम नवघडे -
नागभीड (चंद्रपूर) : ग्रामीण भागातील बेकायदेशीर सावकारी किती अमानुष पातळीवर पोहोचली आहे, याचे धक्कादायक वास्तव नागभीड तालुक्यातून समोर आले आहे. घरात आजीचा मृतदेह असतानाही सावकाराने व्याजाच्या पैशांसाठी फोनवरून तगादा लावल्याचा गंभीर आरोप सावकारांच्या पाशात अडकून किडनी विकणारा मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी ‘लोकमत’कडे केला आहे.
३० ऑगस्ट २०२२ रोजी रोशन कुळे यांच्या आजीचे निधन झाले. संपूर्ण कुटुंब शोकाकुल अवस्थेत असतानाच सकाळीच सावकार प्रदीप रामभाऊ बावनकुळे यांचा पैशांसाठी निरोप आला.
अंत्यसंस्काराची तयारी सुरू तरी सावकाराचा तगादा
मृत्यूची माहिती देऊनही ‘तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, मला माझे पैसे हवेत,’ असे सांगत परिणामांची आठवण करून दिल्याचा आरोप रोशन कुळे यांनी यावेळी केला.
अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, झालेला हा दबाव केवळ अमानवी नाही, तर सावकारी कायद्याची थेट पायमल्ली असल्याचे स्पष्ट होते.
मात्र, अशा प्रकरणांत प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सावकारी प्रतिबंधक समित्यांची भूमिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे, हाही त्याच्या आप बितीमागील सूर होता.
सावकारासठी दुभती गाय - रोशन कुळे यांनी सांगितले की,
सावकार एकदा गरजू व्यक्तीला जाळ्यात ओढले की, त्याला बाहेर पडू देत नाहीत. व्याजावर व्याज, धमक्या आणि मानसिक छळ हेच त्यांचे हत्यार असते. ‘आमच्या दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. त्यांच्यासाठी गरजू माणूस म्हणजे दुभती गाय असतो,’ असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
या सततच्या छळामुळे आपण तीव्र मानसिक दबावाखाली गेलो होतो
आणि दोन वेळा टोकाचे विचार मनात आले, अशी कबुलीही रोशन कुळे यांनी दिली. ही बाब केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील असंख्य शेतकरी आणि गरजूंना भेडसावणाऱ्या संकटाचे भयावह चित्र आहे.