दहशतीचा अंत; बल्लारपूरच्या कुख्यात गुंड छोटू सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’
By परिमल डोहणे | Updated: November 6, 2025 14:35 IST2025-11-06T14:33:49+5:302025-11-06T14:35:14+5:30
Chandrapur : चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई; दहा जणांचा समावेश

End of terror; 'Mokka' on Ballarpur's notorious gangster Chhotu Suryavanshi gang
चंद्रपूर : बल्लारपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड छोटू सुर्यवंशी टोळीवर अखेर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करत कडक पाऊल उचलले आहे. या टोळीतील तब्बल १० जणांविरुद्ध मोक्का कलम लावण्यात आले असून चंद्रपूर पोलिसांनी टोळीचा कणा मोडण्यास यश मिळवले आहे.
टोळीचे नेतृत्व करणारे चंद्रेश उर्फ छोटू देसराज सुर्यवंशी (२३), येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (२७) यांच्यासोबत विविध गुन्ह्यांत सामील असलेले मुकेश राजु वर्मा (२०), अमित बालकृष्ण सोनकर (२६), गौरिश श्रीनिवास कुसमा (१९), अनवर अब्बास शेख (२३) असे मोक्का लागलेल्या गुंडांची नावे आहेत.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी पोलिसांनी गंजवार्ड परिसरात सापळा रचून ही टोळी जेरबंद केली. त्यांच्याकडून २ माऊझर पिस्टल, २ देशी कट्टे, ३५ जिवंत काडतुसे आणि ४ धारदार खंजर असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही टोळी शहरात दरोडा टाकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून पुढे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा गुन्हा टळला.
अशी माजवली दहशत
ही टोळी स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करून दहशत माजवली होती. खुनाचा प्रयत्न, खंडणी, शासकीय कामात अडथळा, दंगा, धमक्या, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केले आहेत. त्यामुळे या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपिओ प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरचे पीआय निशिकांत रामटेके, एलसीबी पीआय अमोल काचोरे, पीएसआय संतोष निंभोरकर, सफौ अरुण खारकर व पोअं गजानन नन्नावरे यांच्या मोक्का पथकाने केली.
"कोणत्याही गुंडाच्या टोळीच्या अवैध मागणीला प्रतिसाद देऊ नये किंवा त्यांच्या धमक्यांना भीक घालू नये. त्यांच्या कृत्यांची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी, जेणेकरून अशा गुन्हेगारीला आळा बसू शकेल."
- मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर