‘एनकाऊंटर’ म्हणजे उपेक्षितांचे वास्तव दर्शन
By Admin | Updated: February 16, 2015 01:14 IST2015-02-16T01:14:02+5:302015-02-16T01:14:02+5:30
चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले.

‘एनकाऊंटर’ म्हणजे उपेक्षितांचे वास्तव दर्शन
अनेकश्वर मेश्राम चंद्रपूर
चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे दोन दिवसीय जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. रविवारला साहित्य संमेलना दरम्यान डॉ. विद्याधर बन्सोड यांनी अॅड. एकनाथराव साळवे यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत अॅड. साळवे यांनी बालपणापासून राजकीय प्रवास, लेखक, सामाजिक कार्य, धर्मांतर ते पत्नी शालीनी साळवे यांना प्रेरणास्थानी मांडण्याचा जीवन प्रवास उलघडून दाखविला. ‘एनकाऊंटर’ ही त्यांची कांदबरी उपेक्षितांचे वास्तव्य दर्शन घडविणारी असल्याचे मुलाखतीत दिसून आले.
मुलाखतीत डॉ. विद्याधर बन्सोड यांनी अॅड. एकनाथराव साळवे यांना त्यांच्या जन्म व शिक्षण यावर बोलते केले असता, अॅड. साळवे म्हणाले, माझा जन्म १९३६ मध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. शैक्षणिक कार्यात जेमतेम परिस्थितीमुळे अडचणी आल्या. त्यावेळी आईची मोलाची साथ लाभली. केवळ शेतीच्या बळावर उदरनिर्वाह चालायचा. शेती व्यवसाय कृषी संस्कृती म्हणून असल्याने त्यावरच आजवरची जडणघडण झाली.
तुमच्या काळातील सेवादलाचे कार्य व आजचे कार्य यातील फरक काय, यावर अॅड. साळवे म्हणाले, कोणतेही कार्य कोणा एकाचे नाही. ते सामुहिक जबाबदारीचे आहे. सेवादलाचे कार्य सामाजिक बांधिलकीचे व प्रामाणिक आहे. आजही त्यात बदल झाला नाही. परंतु, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने काहिसे दुर्लक्ष केल्यामुळे सेवादलाच्या कार्यकर्त्यात काहीशी निराशा आहे. सेवादल सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलातही काम केल्याचे त्यांनी यावेळी उलघडून दाखवले.
राजकीय जीवनपट उलगडताना अॅड. साळवे म्हणाले, मी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे ११ वर्षे प्रतिनिधीत्व केले. त्यावेळी माझेकडे सहा हजाराचे एक वाहन व सायकलवर फिरणारे जीवाभावाचे कार्यकर्ते होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मा.सा. कन्नमवार माझे राजकीय गुरु होते. त्यावेळची राजकीय प्रतिमा प्रामाणिकपणाची होती. आताचे राजकारण भ्रष्टाचार व अप्रमाणिकतेने बरबटले आहे. इमानदारीपासून परावृत्त झाल्याचे त्यांनी खंतही व्यक्त केली.
डॉ. विद्याधर बन्सोड यांनी एकनाथराव साळवे यांनी साहित्यिक व लेखक म्हणून ‘एनकाऊंटर’, ‘बहुजनांचा धर्म बुद्धधम्म’, ‘मी बुद्धधम्माकडे का वळलो’, बिरसा मुंडांवर लेखन कार्य करून धर्मांतर का केले, यावर विचारले असता, ते म्हणाले एनकाऊंटर कादंबरीच्या माध्यमातून उपेक्षितांचे वास्तव जीवन दर्शविण्याचा प्रयत्न केला. ही कादंबरी नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामविष्ट करण्यात आली. शोषितविरहीत समाज रचना मांडण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ आॅक्टोबर १९५६ ला चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे जाण्याचा योग मला आला. जाती व्यवस्थेवर प्रहार म्हणून ते धर्मांतर होते. तेव्हापासून मला तथागत बुद्धाचा धम्म न्याय देणारा, समता बाळगणारा म्हणून स्वत:ला जोडून घेतला. धम्माचे कार्य आचरणात आणून समाजकार्यात सक्रीय आहे. सत्य व अहिंसा तत्व माणसाला माणुसही शिकवणारे आहे.
आजच्या युवा पिढीला काय संदेश देणार, यावर मत व्यक्त करताना अॅड. एकनाथराव साळवे म्हणाले, आजघडीला संगणकाचे युग आहे. दूरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बीभत्सतेचे दर्शन घडविले जाते. याचा विपरीत परिणाम तरुण पिढीवर होत आहे. यातून सावरण्यासाठी विधायक व प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सामाजिक बांधिलकी रुजविण्याची आवश्यकता आहे. भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा संदेश त्यांनी दिला.