प्लास्टिक कचरा निर्मूलनातून गाव पातळीवर रोजगार द्या
By Admin | Updated: February 19, 2017 00:30 IST2017-02-19T00:30:08+5:302017-02-19T00:30:08+5:30
प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्याचा परिणाम पशुधनावर होत आहे.

प्लास्टिक कचरा निर्मूलनातून गाव पातळीवर रोजगार द्या
विभागीय आयुक्तांचे निर्देश : जि.प. व जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
चंद्रपूर : प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्याचा परिणाम पशुधनावर होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी गावस्तरावर युनिट स्थापन करून गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, असे निर्देश नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शनिवारी येथे दिले.
जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी विविध योजनांची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. अनुपकुमार यांनी प्लास्टिक कचऱ्याकडे अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले.गावात प्लास्टिक कचरा पशु खातात. त्यातून त्यांना आजार होऊन मरण पावतात. त्यामुळे पशुधन कमी झाले आहे. तसेच गार्इंचे दूधही कमी झाले आहे. ही समस्या मिटवायची असेल तर प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्याकरिता गावपातळीवर युनिट तयार केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
गाव पातळीवर स्वच्छ भारत मिशन आणि जलयुक्त शिवार कार्यक्रमांची कामे प्राधान्याने करण्यात यावी. या कामात हयगय करण्यात आल्यास गय केली जाणार नाही, असा इशारा अनुपकुमार यांनी दिला. तत्पूर्वी जिल्हा विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण विभाग, सिंचन विभाग, जि.प. पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आदींचे सादरीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांनी केले. या बैठकीला विभागीय उपायुक्त (विकास) विपुल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) रवींद्र मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आॅरगॅनिक खाद्य पदार्थांचे ब्रॅडिंग करा
बचत गटामार्फत आॅरगॅनिक खाद्य पदार्थांनी निर्मिती करण्यात यावी. या आॅरगॅनिक खाद्य पदार्थांचे ब्रँडिंग करण्यात यावे. महिला बचतगटांमध्ये मार्केटिंगचे कौशल्य निर्माण करावे. शेतकरी बचतगट आणि महिला बचतगटांची सांगड घालून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे. जिल्ह्यात चांगले बचतगट निर्माण करावेत, अशा सूचनाही अनुपकुमार यांनी दिल्या.
जिल्हा ‘टॉप टेन’मध्ये राहावा
विविध शासकीय योजना राबवून राज्यात चंद्रपूर जिल्हा टॉप टेनमध्ये राहिला पाहिजे. मूल व पोंभुर्णा येथे होत असलेले वॉटरपार्क आणि सॅनिटरीपार्कचे काम खुप चांगले आहे. प्रत्येक कामाचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आव्हान समजून चांगली कामे करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.